“एलपीजी गॅसचा काळाबाजार थांबवा!” – नांदेडमध्ये तीव्र आंदोलनाचा इशारा




नांदेड,दि.४- : जिल्ह्यात वाढत्या एलपीजी गॅस टंचाईमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले असून, या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली आहे. गॅस एजन्सीकडून सुरू असलेल्या कथित काळाबाजाराविरोधात तात्काळ कठोर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.


दक्षिण जिल्हा अध्यक्ष शंकर महाजन व उत्तर जिल्हा अध्यक्ष राज आटकोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची भेट घेत निवेदन सादर केले. जागतिक परिस्थितीमुळे गॅस टंचाई असल्याचे सांगितले जात असले, तरी नांदेडमध्ये कृत्रिम तुटवडा निर्माण करून काही एजन्सी जादा दराने गॅस विक्री करत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला.


सध्या नागरिकांना गॅस मिळवण्यासाठी एजन्सीसमोर तासन्तास रांगेत उभे राहावे लागत आहे. याचा सर्वाधिक फटका कामगार, शेतकरी आणि सर्वसामान्य कुटुंबांना बसत आहे. महिलांना होणारा त्रास, तसेच रांगेत उभे राहून घडणाऱ्या दुर्दैवी घटनांकडेही निवेदनातून लक्ष वेधण्यात आले.



याशिवाय, सीएनजी गॅसच्या अभावामुळे वाहनचालकांनाही आर्थिक फटका बसत असल्याचे नमूद करण्यात आले.


👉 मुख्य मागण्या :


गॅसचा नियमित व सुरळीत पुरवठा करावा


काळाबाजार करणाऱ्या एजन्सींवर तात्काळ कारवाई करावी


नागरिकांना त्रास होणार नाही यासाठी नियंत्रण यंत्रणा मजबूत करावी



यावेळी जिल्हा महासचिव रवी पंडित, दीपक मगर, संजय टिके, ॲड. जयपाल ढवळे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.


⚠️ “मागण्या मान्य न झाल्यास रस्त्यावर उतरणार” – आघाडीचा इशारा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या