दिनांक,३/०४/२०२६
प्रतिनिधी | नाशिक/अहिल्यानगर
राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या अशोक खरात प्रकरणात नवे धक्कादायक वळण समोर आले असून, आर्थिक गैरव्यवहाराची व्याप्ती आणखी वाढल्याचे स्पष्ट होत आहे. विशेष पोलीस पथकाच्या तपासात तब्बल १०० कोटी रुपयांच्या व्यवहारांचा मागोवा घेतला जात असताना, रुपाली चाकणकर यांच्या कुटुंबीयांशी संबंधित खात्यांमधून मोठ्या रकमेची उलाढाल झाल्याची माहिती समोर आली आहे.
तपासानुसार, खरात याने धार्मिक श्रद्धेचा गैरफायदा घेत शेकडो लोकांकडून पैसे उकळले. महिलांवरील अत्याचार, जादूटोणा, धमक्या देणे आणि जमीन बळकावणे अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये तो आधीच अडकलेला आहे. सध्या तो न्यायालयीन कोठडीत असून, इतर गुन्ह्यांमध्ये पोलीस कोठडीही सुनावण्यात आली आहे.
या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे प्रतिभा चाकणकर यांच्या नावावरील खात्यातून ४० ते ५० कोटी रुपयांचे संशयास्पद व्यवहार झाल्याचे उघड झाले आहे. संबंधित खाते त्या पतसंस्थांमध्ये असल्याचे सांगितले जाते, ज्या संस्थांचा वापर खरातने मोठ्या आर्थिक व्यवहारांसाठी केला होता.
खरातने आपल्या व्यावसायिक भागीदाराच्या माध्यमातून ‘जगदंब पतसंस्था’ आणि ‘समता पतसंस्था’ या माध्यमातून आर्थिक जाळे उभे केले होते. अनेक खात्यांमध्ये तो स्वतः नॉमिनी म्हणून नोंदवला गेला असून, सर्व व्यवहारांवर त्याचे नियंत्रण असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. विशेष म्हणजे, अनेक खात्यांना त्याचाच मोबाईल क्रमांक जोडलेला होता.
दरम्यान, रुपाली चाकणकर यांनी यापूर्वी अशोक खरातशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र नव्या घडामोडींमुळे या प्रकरणातील गुंतागुंत वाढली असून, राजकीय वर्तुळातही चर्चांना उधाण आले आहे.
सध्या संबंधित पतसंस्थांच्या पदाधिकाऱ्यांची चौकशी सुरू असून, आणखी मोठे आर्थिक व्यवहार उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणात पुढील काही दिवसांत महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे.

0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज