भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाचा पर्दाफाश; लैंगिक शोषण, ब्लॅकमेलिंग आणि आर्थिक लुबाडणुकीचे जाळे उघड



प्रतिनिधी | विशेष वृत्त

नाशिक, दि.४-:धार्मिक विधींच्या नावाखाली महिलांना जाळ्यात ओढून त्यांचे लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप असलेला भोंदूबाबा अशोक खरात याला १८ मार्च रोजी पोलिसांनी अटक केली असून, या प्रकरणात दररोज धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. सुरुवातीला केवळ लैंगिक अत्याचाराचा गुन्हा म्हणून समोर आलेले हे प्रकरण आता मोठ्या गुन्हेगारी जाळ्यात रूपांतरित झाल्याचे तपासात उघड होत आहे.

पोलिस तपासात उघड झालेल्या माहितीनुसार, खरात हा स्वतःला अध्यात्मिक शक्ती लाभलेला असल्याचे भासवून महिलांना विविध अडचणींवर उपाय सांगण्याच्या बहाण्याने आपल्या संपर्कात आणत होता. विशेषतः वैयक्तिक, कौटुंबिक किंवा आरोग्याशी संबंधित समस्यांवर ‘गुप्त विधी’ करण्याचे आमिष दाखवून तो महिलांना एकांतात बोलावून घेत असे.

या ‘विधी’ दरम्यान संबंधित महिलांवर लैंगिक अत्याचार करून त्यांचे अश्लील व्हिडिओ चित्रीत केले जात असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर हेच व्हिडिओ दाखवून पीडित महिलांना धमकावणे, ब्लॅकमेल करणे आणि पुन्हा पुन्हा अत्याचार करणे—अशा प्रकारे एक भयावह चक्र सुरू ठेवले जात असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.या प्रकरणात केवळ महिलांचे शोषणच नव्हे, तर ‘भक्त’ म्हणून येणाऱ्या इतर नागरिकांचीही मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक केल्याचे समोर आले आहे. विविध धार्मिक उपाय, ग्रहदोष निवारण, व्यवसायातील यश, वैवाहिक अडचणी दूर करण्यासाठी मोठ्या रकमा उकळल्या जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

या गंभीर प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकाकडे (SIT) सोपवण्यात आला असून, विविध तांत्रिक पुरावे, मोबाईल डेटा आणि आर्थिक व्यवहारांची सखोल छाननी सुरू आहे. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, आणखी अनेक पीडित महिलांचा शोध लागण्याची शक्यता असून, प्रकरणाचा विस्तार वाढण्याची चिन्हे आहेत.

या घटनेमुळे समाजात संतापाची लाट उसळली असून, अशा भोंदूबाबांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, प्रशासनावर जलद आणि कठोर पावले उचलण्याचा दबाव वाढत आहे.



भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने अंधश्रद्धा, भीती आणि अज्ञानाचा फायदा घेत कशाप्रकारे गंभीर गुन्हे केले जाऊ शकतात, याचे भयावह वास्तव समोर आणले आहे. या प्रकरणातील पुढील तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या