सातारा,दि.२४- : जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असून नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल, असा ठाम निर्वाळा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी दिला.
नवीन जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचे महालक्ष्मी आधार फाउंडेशनच्या संस्थापिका प्रतिभा शेलार आणि बंधुत्व प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल वीर यांनी पुष्पगुच्छ व भारतीय संविधानाची प्रस्तावना देऊन स्वागत केले. यावेळी विविध सामाजिक व कायदा-सुव्यवस्था विषयक मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
संस्थेच्या वतीने सादर करण्यात आलेल्या निवेदनात जिल्ह्यात वाढत असलेल्या सायबर गुन्हे, ऑनलाईन फसवणूक, महिलांवरील अत्याचार, छेडछाड आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. ग्रामीण भागात पोलीस गस्त वाढवून चोरी व घरफोडी रोखाव्यात, तसेच शाळा-महाविद्यालय परिसरात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणीही करण्यात आली.
तसेच अवैध दारू विक्री व अंमली पदार्थांवर कठोर कारवाई, वाहतूक कोंडी व अपघातप्रवण ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवणे, सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करून जनजागृती करण्याची गरज व्यक्त करण्यात आली. महिलांविरोधात अश्लील व अपमानास्पद भाष्य करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, महिला हेल्पलाईन अधिक कार्यक्षम करावी, तसेच गावपातळीवर पोलीस-नागरिक समन्वय वाढवण्यावर भर देण्यात आला.
याशिवाय भाडेकरू नोंदणी प्रक्रिया प्रभावी करणे, सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, नागरिकांच्या तक्रारींचे जलद व पारदर्शक निवारण करण्यासाठी विशेष यंत्रणा उभारावी, अशा मागण्या निवेदनात नमूद करण्यात आल्या. पोलीसांनी तक्रारदारांशी संवेदनशील व सन्मानपूर्वक वागावे, तसेच पोलीस दलातील शिस्त बळकट करण्याबरोबरच कर्मचाऱ्यांच्या कल्याण व ताणतणाव व्यवस्थापनाकडे लक्ष द्यावे, अशीही अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
दरम्यान, शहरातील वाढत्या अतिक्रमणाच्या समस्येकडेही लक्ष वेधण्यात आले असून नगरपरिषद व वाहतूक विभागाने संयुक्त कारवाई करून रस्ते व सार्वजनिक जागा मोकळ्या ठेवाव्यात, अशी मागणी करण्यात आली.

0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज