“आंबेडकर स्मारकावर सरकारचा खेळखंडोबा; पालकमंत्र्यांविरोधात संताप उसळला!”


अनिल वीर 

सातारा,दि.२३- : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या प्रलंबित कामांबाबत साताऱ्यातील वातावरण पुन्हा तापले असून, स्मारक समितीने पालक मंत्री शंभुराज देसाई यांच्या भूमिकेविरोधात तीव्र निषेध व्यक्त केला आहे. एक महिन्यापूर्वी लेखी पत्र देऊनही भेटीसाठी वेळ न देण्यात आल्याचा गंभीर आरोप समितीकडून करण्यात आला आहे.


समितीच्या म्हणण्यानुसार, दोन वेळा लेखी पत्रव्यवहार करूनही कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे या महत्त्वाच्या प्रश्नाकडे शासनाची उदासीनता स्पष्ट होत असल्याची टीका करण्यात आली. “लोकशाही मार्गाने निवेदन देण्याचा अधिकार असताना कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा देणे ही गंभीर बाब आहे,” असा संताप समितीने व्यक्त केला.


पालक मंत्री तसेच पर्यटन मंत्री म्हणून दीर्घकाळ जबाबदारी सांभाळूनही, या राज्य संरक्षित स्मारकाच्या प्रश्नावर अपेक्षित गांभीर्याने दखल घेतली जात नसल्याचा आरोपही करण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून विविध स्तरांवर हा मुद्दा उपस्थित होत असतानाही ठोस निर्णय न झाल्याने समितीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.


दरम्यान, निवासस्थानी आंदोलन करण्याऐवजी शासनाचे प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून निषेध नोंदविण्यात येणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत यांनी दिली.


यावेळी समितीचे पदाधिकारी गणेश कारंडे, वामन मस्के, राजरत्न कांबळे, सुनील त्रिंबके, तानाजी नागटिळक, अशोकराव नागटिळक, श्रीरंग वाघमारे, सुनील निकाळजे, अजित कांबळे आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या