“‘मांगट्या चा तमाशा’ म्हणत हल्ला; नारायणगावात संतापाचा स्फोट!”


नारायणगाव, (प्रतिनिधी)दि.१९-:नारायणगाव येथे सुप्रसिद्ध तमाशा सम्राज्ञी विठाबाई भाऊ नारायणगावकर यांच्या नावाने चालणाऱ्या तमाशा फडावर झालेल्या भ्याड आणि जातीय द्वेषातून प्रेरित हल्ल्याने परिसरात प्रचंड संताप उसळला आहे. “हा मांगाचा तमाशा आहे, मारा मारा” अशी घोषणाबाजी करत हल्लेखोरांनी कलावंतांवर हल्ला केल्याचा गंभीर आरोप पीडितांनी केला आहे.

या घटनेत महिलांसह अनेक तरुण जखमी झाले असून, एका महिलेच्या पोटात लाथ मारण्यात आली तर एका मुलीला ओढून नेण्याची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जखमींच्या जखमा अजूनही ताज्या असल्याने हल्ल्याची क्रूरता स्पष्ट होते.

पीडितांच्या म्हणण्यानुसार, गाडीवर “विठाबाई मांग नारायणगावकर” असे नाव पाहूनच हल्लेखोरांनी जातिवाचक शिवीगाळ केली. मात्र, पोलिसांकडे फिर्याद देताना हे महत्त्वाचे मुद्दे नोंदवले गेले नसल्याने पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.




नारायणगाव बसस्थानकाजवळ उभा असलेला विठाबाई भाऊ नारायणगावकर यांचा पुतळा त्यांच्या महान कार्याची साक्ष देतो. भारत-चीन युद्ध काळात त्यांनी गर्भवती असतानाही सीमारेषेवर जाऊन सैनिकांसाठी कार्यक्रम सादर करत देशसेवा केली होती. अशा महान कलावंतांच्या वारसांवर झालेला हल्ला समाजासाठी लज्जास्पद मानला जात आहे.



या प्रकरणात अद्याप ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. स्थानिक खासदार अमोल कोल्हे यांनीही या घटनेची दखल घेतली नसल्याचा आरोप होत आहे. हल्ल्यात फडाच्या वाहनाचे ८ ते १० लाख रुपयांचे नुकसान झाले असूनही शासनाकडून कोणतीही मदत मिळालेली नाही.

ऑल इंडिया पँथर सेना राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी या घटनेचा तीव्र निषेध करत तमाशा कलावंतांच्या सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. “कलावंतांवर अन्याय सहन केला जाणार नाही,” असा इशारा देण्यात आला आहे.




अॅट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत कठोर कारवाई

तमाशा फडांना पोलीस संरक्षण

प्रकरण फास्टट्रॅक न्यायालयात चालवावे

पीडितांना तात्काळ आर्थिक मदत

कलावंतांना किमान १० हजार रुपये मानधन

तमाशा महामंडळ स्थापन करून १०० कोटींचे अनुदान प्रमुख मागणी करण्यात आली.

नारायणगावातील हा प्रकार केवळ एका तमाशा फडावरचा हल्ला नसून, तो कला, संस्कृती आणि सामाजिक समतेवर झालेला गंभीर आघात असल्याचे मानले जात आहे. या घटनेची तात्काळ आणि कठोर दखल घेण्याची मागणी जोर धरत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या