महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून मंगळसूत्र लुटले; पोलिसांच्या चौकशीत शेतकऱ्यांच्या ८ मोटारी चोरीचे रहस्य उघड!


फलटण ,दि.२१-: फलटण ग्रामीण पोलिसांनी एका धक्कादायक चोरीच्या प्रकरणाचा छडा लावताना महिलेला लक्ष्य करून मंगळसूत्र लुटणाऱ्या आरोपीकडून विडणी परिसरातील शेतकऱ्यांच्या तब्बल ८ मोटार चोरीच्या गुन्ह्यांची उकल केली आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून, शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.


फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील विडणी गावाच्या परिसरात दि. १३ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६.३० वाजता महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरदस्तीने काढून घेण्याची घटना घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी अर्थव उर्फ चिन्मय छगन सुतार (वय २०, रा. विडणी, ता. फलटण, जि. सातारा) याला ताब्यात घेऊन चौकशी केली.


पोलिसांच्या चौकशीत आरोपीने विडणी भागामध्ये ८ ठिकाणी शेतकऱ्यांच्या मोटार चोरी केल्याची कबुली दिल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे. या गुन्ह्यांमधून चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी सुमारे ४ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


१० दिवसांत १४ गुन्ह्यांचा छडा!


फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने मागील दहा दिवसांत तब्बल १४ गुन्हे उघडकीस आणले आहेत. यामध्ये मोटार चोरीसह विविध चोरीच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. पोलिसांच्या या कामगिरीमुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.


मंगळसूत्र चोरी तसेच मोटार चोरीच्या गुन्ह्यांमध्ये संबंधित शेतकऱ्यांच्या मोटारी परत मिळाल्याने शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे. शेतीसाठी अत्यावश्यक असलेल्या पाण्याच्या मोटारी चोरीला गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत होते. मात्र पोलिसांनी आरोपीचा शोध घेत चोरीच्या घटनांचा पर्दाफाश केल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.


वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई


ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक शैलेश कडकुरे, उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण धवलकुमार गोडसे यांच्या सूचनेनुसार करण्यात आली.


प्रभारी अधिकारी फलटण ग्रामीण पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत सुबनावळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी केली. पथकात पोलीस निरीक्षक दीपक पवार, पोलीस हवालदार नितीन गायकवाड, अमोल गाडेकर, श्रीनाथ कदम, सचिन बावरे, विक्रम बनकर तसेच पोलीस कॉन्स्टेबल हनुमंत दडस यांनी सहभाग घेतला.


फलटण ग्रामीण पोलिसांच्या या कारवाईमुळे विडणी परिसरातील चोरीच्या घटनांना आळा बसण्यास मदत होणार असून, आणखी काही गुन्ह्यांचा तपास उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.


फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या प्रभावी कारवाईचे परिसरातून कौतुक करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या