फलटण: [प्रतिनिधी]
फलटण शहर परिसरात बिगर नंबरच्या दुचाकीवरून पिस्तूल विक्रीच्या उद्देशाने फिरणाऱ्या दोन तरुणांना फलटण शहर पोलिसांनी अत्यंत हुशारीने सापळा रचून रंगेहात पकडले आहे. त्यांच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल, एक जिवंत कारतूस आणि दुचाकी असा एकूण १ लाख ६५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
स्टेट बँक शाखेजवळ रचला सापळा
१६ ऑगस्ट २०२६ रोजी फलटण शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, एक विनानंबरच्या युनिकॉर्न मोटरसायकलवरून दोन संशयित तरुण पिस्तूल विकण्यासाठी फलटण शहरात आले आहेत. या माहितीच्या आधारे त्यांनी तात्काळ डी.बी. पथकाला सूचना दिल्या. पोलीस पथकाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या फलटण शाखेजवळ सापळा लावून संशयित दुचाकीला रोखले.
कमरेला खोचलेले पिस्तूल जप्त
दुचाकीवर मागे बसलेल्या तरुणाची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला खोचलेले देशी बनावटीचे पिस्तूल आणि मॅगझिनमध्ये एक जिवंत कारतूस मिळून आले. पोलिसांनी तात्काळ शस्त्र जप्त करून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेले आरोपी:
जय दयानंद मागाडे (वय २० वर्षे, रा. आंबेडकरनगर, साखरेवाडी, ता. फलटण, जि. सातारा)
प्रदीप संतोष गोरे (वय २२ वर्षे, रा. खामगाव रोड, साखरेवाडी, ता. फलटण, जि. सातारा)
जप्त केलेला मुद्देमाल:
देशी बनावटीचे पिस्तूल (किंमत ₹५०,०००/-)
एक जिवंत कारतूस (किंमत ₹२००/-)
काळ्या रंगाची विनानंबर युनिकॉर्न मोटरसायकल (किंमत ₹१,१५,०००/-)
एकूण मुद्देमाल: ₹१,६५,२००/-
या प्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ३०३/२०२६ नुसार शस्त्र अधिनियम कलम ३, २५ सह म.पो.का. कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही धडक कारवाई सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत फलटण शहर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी घनश्याम बल्लाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक मिटू जगदाळे, सपोनि एस. व्ही. शिंदे तसेच डी.बी. पथकाचे पोलीस हवालदार संतोष नाळे, मुकेश घोरपडे, जितेंद्र टिके आणि अतुल बडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे करत आहेत.

0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज