फलटण:[प्रतिनिधी] दि.21 ऑगस्ट 2026,
रात्रीच्या वेळी एखाद्या ज्येष्ठ आमदाराच्या घरासमोर जाऊन उभे राहणे आणि राजकीय स्टंटबाजी करणे, ही फलटण तालुक्याची राजकीय संस्कृती नाही. राजकारणात विचार आणि टीकेचे प्रत्युत्तर स्टेजच्या माध्यमातून दिले गेले पाहिजे. अशा प्रकारच्या कृत्यांमुळे तालुक्यातील शांतता आणि राजकीय वातावरण गढूळ होत आहे, अशा तीव्र शब्दांत सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग अहिवळे यांनी माजी खासदारांच्या त्या कृत्याचा जाहीर निषेध नोंदवला आहे.
स्टेजवरून उत्तरे द्या, घरासमोर स्टंटबाजी कशाला?
गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातील राजकीय वातावरण तापले आहे. यातच माजी खासदारांनी रात्रीच्या वेळी थेट ज्येष्ठ आमदारांच्या घरासमोर-गेटासमोर जाऊन उभे राहणे आणि आव्हान देण्याचा प्रकार केला. यावर प्रतिक्रिया देताना पांडुरंग अहिवळे यांनी सांगितले की, "राजकारणात मतभेद, आरोप आणि प्रत्यारोप असणे स्वाभाविक आहे. मात्र, त्याला उत्तर देण्यासाठी जाहीर सभा, पत्रकार परिषदा किंवा विचारपीठ (स्टेज) उपलब्ध असतात. ते सोडून रात्रीच्या वेळी थेट घरासमोर जाऊन असे प्रकार करणे ही निव्वळ चमकोगिरी आणि स्टंटबाजी आहे."
तालुक्याची उच्च राजकीय संस्कृती जोपासा:
फलटण तालुक्याला प्रगल्भ राजकीय आणि सामाजिक संस्कृतीचा मोठा वारसा लाभला आहे. सर्वपक्षीय नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी ही संस्कृती जपण्याची गरज आहे. केवळ राजकीय फायद्यासाठी किंवा चर्चेत राहण्यासाठी अशा पद्धतीचे कृत्य केल्यास तालुक्यातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि कार्यकर्तेही विनाकारण आपापसात टकरायाला लागतील.
संयम बाळगण्याचे आवाहन:
तालुक्यातील सर्वच राजकीय नेत्यांनी व पदाधिकाऱ्यांनी जबाबदारीने वागून लोकशाही मार्गाने आपले विचार मांडावेत. सूडबुद्धीचे वागणूक किंवा वैयक्तिक पातळीवर जाऊन भीतीचे वातावरण तयार करणारे राजकारण तात्काळ थांबवून फलटणची राजकीय संस्कृती जपावी, असे आवाहनही पांडुरंग अहिवळे यांनी या प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज