फलटण:[प्रतिनिधी]
फलटण ग्रामीण भागातील मांडवखडक (ता. फलटण) हद्दीतील हॉटेल बाणगंगा शेजारी रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना अडवून लुटण्याच्या तयारीत असलेल्या टोळीचा फलटण ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी २ किलोमीटर पाठलाग करून दोन आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून लुटीसाठी वापरण्यात येणारा मुद्देमाल जप्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मांडवखडक हद्दीत हॉटेल बाणगंगाजवळ काही संशयित इसम रस्त्यावरील लोकांना लुटणार असल्याची खात्रीशीर बातमी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मा. राजकुमार भुजबळ यांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण पथक तात्काळ घटनास्थळी रवाना झाले. पोलिसांची चाहूल लागताच तेथे जमलेले ५ संशयित आरोपी पळून जाऊ लागले.
पोलिसांच्या पथकाने अत्यंत शिताफीने सुमारे २ किलोमीटर पाठलाग करून ऊसाच्या शेतातून व कुरवलीच्या तलावाजवळून २ आरोपींना ताब्यात घेतले. या कारवाईत ३ आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
अटक करण्यात आलेले आरोपी:
१. राहुल नाना घुले (रा. इंदिरा नगर, मलठण, ता. फलटण, जि. सातारा)
२. नंदकुमार भागोजी सोनवणे (रा. झिरपवाडी, ता. फलटण, जि. सातारा)
अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून चोरी व लुटमारीसाठी लागणारे साहित्य (मुद्देमाल) जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४८२/२०२६, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१०(४)(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेतील आरोपींकडून ग्रामीण भागातील इतरही अनेक चोरीचे व लुटमारीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
कारवाई करणारे पोलीस पथक:
ही कामगिरी सातारा पोलीस अधीक्षक मा. निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक मा. वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी (फलटण) मा. धन्यकुमार गोडसे आणि पोलीस निरीक्षक मा. राजकुमार भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या धडक कारवाईत गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत सुबनावळ, पोलीस उपनिरीक्षक दिपक पवार, पोलीस हवालदार नितीन चतुरे, अमोल जगदाळे, श्रीनाथ कदम, तसेच पोलीस कॉन्स्टेबल हनुमंत दडस व तुषार नलवडे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली

0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज