उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, नर्सांच्या तक्रारींचे वेळेत निवारण करा!

भीम आर्मी संघटनेचे वैद्यकीय अधीक्षकांना निवेदन; वेळेवर वेतनासह तणावमुक्त वातावरणाची मागणी



फलटण,दि.११- : फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, नर्स व इतर कर्मचाऱ्यांच्या विविध अडचणी व तक्रारींचे वेळेत निवारण करण्यात यावे, अशी मागणी भीम आर्मी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांना निवेदन दिले.


रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉक्टर, नर्स व स्टाफ यांच्या विविध तक्रारींकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन त्यांचे प्रथम प्राधान्याने निराकरण करावे. कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी येणाऱ्या अडचणी तातडीने सोडवाव्यात तसेच त्यांचे वेतन वेळेवर करण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.


डॉक्टर, नर्स आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवर कोणत्याही प्रकारचा अनावश्यक तणाव किंवा दबाव राहू नये. त्यांना सुरक्षित, सकारात्मक व तणावमुक्त वातावरण उपलब्ध करून दिल्यास ते अधिक प्रभावीपणे रुग्णसेवा करू शकतील, असे संघटनेने नमूद केले आहे.


रुग्णसेवा ही अत्यंत संवेदनशील बाब असून, रुग्णांची सेवा करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समस्या दुर्लक्षित राहू नयेत. त्यांच्या तक्रारींचे वेळेत निवारण करून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्यात, अशी अपेक्षा भीम आर्मी संघटनेने व्यक्त केली.


या निवेदनाची वैद्यकीय अधीक्षक योग्य दखल घेऊन डॉक्टर, नर्स व स्टाफ यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करतील, असा विश्वासही संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आला.


निवेदन देतेवेळी अजित संभाजी मोरे, सुनील पवार, आदेश कांबळे, तुषार जाधव, तेजस भोसले यांच्यासह भीम आर्मी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या