रस्त्यावर दबा धरून बसलेल्या लुटारूंच्या टोळीवर पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’; २ जेरबंद, ३ फरार
प्रतिनिधी:
फलटण,दि.१०- : फलटण ग्रामीण भागात रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना अडवून लुटण्याच्या तयारीत असलेल्या टोळीचा डाव फलटण ग्रामीण पोलिसांनी उधळून लावला. पोलिसांच्या धडक कारवाईत दोन संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून तीन आरोपी फरार झाले आहेत. या कारवाईमुळे परिसरात लुटमारीच्या घटनांना आळा बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मांडवखडक, ता. फलटण गावच्या हद्दीत हॉटेल वाघणगावच्या बाजूला काही संशयित इसम रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना लुटण्याच्या तयारीत असल्याची खात्रीशीर माहिती पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांना मिळाली होती.
मिळालेल्या माहितीच्या आधारे फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांचे पथक तेथे पोहोचताच पाच संशयित आरोपी पोलिसांच्या नजरेस पडले. पोलिसांची चाहूल लागताच संशयितांनी तेथून पळ काढला.
मात्र, पोलिसांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. तब्बल दोन किलोमीटरपर्यंत पाठलाग करून पोलिसांनी पाचपैकी दोन आरोपींना ऊसाच्या शेतातून तसेच कुरवलीच्या तलावाजवळून मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. आरोपींकडून लुटमार व चोरी करण्यासाठी वापरण्यात येणारा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या कारवाईत राहुल नाना धुळे, रा. इंदिरानगर, फलटण, ता. फलटण, जि. सातारा आणि नंदकुमार भागोजी सोनवणे, रा. झिरपवाडी, ता. फलटण, जि. सातारा यांना अटक करण्यात आली आहे. तर तीन आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ४८२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१०(४)(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपींना पकडल्यानंतर आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
या कारवाईमुळे ग्रामीण भागातील रस्त्यांवर प्रवाशांना लक्ष्य करून लुटमारीचा प्रयत्न करणाऱ्या टोळीला मोठा धक्का बसला आहे. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास वेगाने सुरू असून, या टोळीने यापूर्वी अशाच प्रकारचे आणखी गुन्हे केले आहेत का, याचाही तपास केला जात आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण धन्यकुमार गोडसे यांच्या सूचनांनुसार तथा पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत सुबनावळ, पोलीस उपनिरीक्षक दीपक पवार, पोलीस हवालदार नितीन चतुरे, अमोल जगदाळे, श्रीनाथ कदम, पोलीस कॉन्स्टेबल हनुमंत दडस, नुसार नलवडे आदी पोलिस कर्मचारी सहभागी झाले होते.
फलटण ग्रामीण पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे रस्त्यावर लुटमारीचा डाव आखणाऱ्यांना चांगलाच दणका बसला आहे. फरार आरोपी कधी पोलिसांच्या जाळ्यात अडकतात, याकडे आता परिसराचे लक्ष लागले आहे.


0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज