माळेगाव शिवनगरमध्ये मोटारसायकलला धडक देत तरुणासह तिघांकडून मारहाण; माळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
बारामती | प्रतिनिधी
दि.९-: माळेगाव बु. येथील शिवनगर परिसरात राजकीय वादातून एका ५२ वर्षीय व्यक्तीवर लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि. ९ ऑगस्ट) सकाळी घडली. या प्रकरणी माळेगाव पोलीस ठाण्यात अजिंक्य उर्फ पप्पु सुरेश भोसले याच्यासह दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नितीन वसंतराव तावरे (वय ५२, व्यवसाय शेती, रा. माळेगाव शिवनगर, ता. बारामती) हे रविवारी सकाळी सुमारे ९.५० वाजता केस कापून व केसांना डाय करून मोटारसायकलवरून शिवनगर येथील आपल्या घरी जात होते. त्यावेळी माळेगाव-शिरवली रोडवरील दफनभूमीजवळ अजिंक्य उर्फ पप्पु सुरेश भोसले याने आपल्या मोटारसायकलवर दोन अनोळखी व्यक्तींना बसवून तावरे यांच्या मोटारसायकलला धडक दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
यानंतर आरोपीने लोखंडी रॉडने तावरे यांच्या छातीच्या उजव्या बाजूस मारल्याचे तसेच पुन्हा रॉडने मारहाण करून खाली पाडल्याचे फिर्यादीत नमूद आहे. त्यानंतर तिघांनी मिळून हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण करून गंभीर दुखापत केल्याचा आरोप आहे.
"आमचे विरोधात साक्ष देतो काय? गावच्या राजकारणात लय पुढे पुढे करतोस, आता तुझ्याकडे बघतोच," अशा आशयाची धमकी देण्यात आल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या हल्ल्यात फिर्यादी नितीन तावरे हे स्वतः जखमी झाले असून त्यांच्यावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मेडिकल हॉस्पिटल येथे उपचार करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
या प्रकरणी माळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. १९९/२०२६ अन्वये BNS कलम 109(1), 115(2), 126(2), 351(2), 351(3), 352 व 3(5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा रविवारी दि. ९ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ४.५२ वाजता नोंद क्र. १७/२०२६ अन्वये दाखल करण्यात आला.
या प्रकरणात लोखंडी रॉडचा वापर झाल्याचे पोलिस नोंदीत नमूद आहे. गुन्ह्याचा तपास पोसई देवीदास साळवे करीत असून गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही पोसई संजय मोहिते यांनी केली.
दरम्यान, हल्ल्याचे नेमके कारण, घटनेमागील पूर्ववैमनस्य आणि दोन अनोळखी व्यक्तींची ओळख याबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज