फलटण ग्रामीण पोलिसांचा सस्तेवाडीत धडक छापा; गावठी हातभट्टी दारू अड्डा उद्ध्वस्त

 


फलटण, प्रतिनिधी,दि.२- :फलटण ग्रामीण पोलिसांनी गावठी हातभट्टी दारू निर्मितीच्या अड्ड्यावर धडक कारवाई करत सुमारे ₹२.५० लाखांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट केला. या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली असून अन्य आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


मा. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, मा. अपर पोलीस अधीक्षक पैशाली कुखुंकर तथा उपविभागीय पोलीस अधिकारी धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध धंद्यांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.


या मोहिमेअंतर्गत दिनांक ३० जुलै २०२६ रोजी मौजे सस्तेवाडी, ता. फलटण, जि. सातारा येथे काही इसम गावठी हातभट्टीची दारू गाळण्याच्या तयारीत असल्याची गोपनीय व खात्रीशीर माहिती फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याला मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत सुबनावकर यांच्या पथकाने सस्तेवाडी परिसरात छापा टाकला.


या कारवाईदरम्यान सुमारे ७०० लिटर गावठी हातभट्टीची विषारी दारू, दोन लोखंडी कढया, दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारे साहित्य, गुळाचे डेपे, नवसागर तसेच इतर साहित्य असा एकूण अंदाजे ₹२.५० लाखांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला.


या प्रकरणी पियुष रमेश चव्हाण (रा. सोमवार पेठ, फलटण) याला अटक करण्यात आली आहे. तसेच कृष्णा ऊर्फ प्या विश्वास पवार, गणेश मोहिते आणि रुपेश चव्हाण (पूर्ण नाव व पत्ता तपासाधीन) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलीस प्रशासनाने अवैध दारू, जुगार, मटका तसेच इतर बेकायदेशीर धंद्यांविरोधातील मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. नागरिकांनी अशा अवैध कृत्यांबाबत गोपनीय माहिती दिल्यास त्यांचे नाव गोपनीय ठेवून तात्काळ कारवाई करण्यात येईल, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.


सदर कारवाई पोलीस निरीक्षक राजकुमार शुजबकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत सुबनावकर, पोलीस उपनिरीक्षक दिपक पवार तसेच पोलीस कर्मचारी अमोल जगदाळे, खरात, चतुरे, कदम, दडस आणि इतर पथकातील कर्मचाऱ्यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या