विश्वासघाताची मोठी शिक्षा! पक्षकाराची ₹१० लाखांची फसवणूक करणाऱ्या वकिलाला १ वर्ष सक्तमजुरी

 बारामती न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ₹२५ हजार दंड, वारसांना नुकसानभरपाईचे आदेश



बारामती | प्रतिनिधी,दि.२-:विश्वासाच्या नात्याचा गैरफायदा घेत पक्षकाराच्या नुकसानभरपाईतील ₹१० लाख स्वतःच्या खात्यावर वळविल्याप्रकरणी बारामती न्यायालयाने आरोपी वकील अॅड. बापू बाबुराव दिवेकर यांना भारतीय दंड संहिता कलम ४२० अंतर्गत दोषी ठरवत एक वर्ष सक्तमजुरी व ₹२५ हजार दंडाची शिक्षा सुनावली आहे.


न्यायिक दंडाधिकारी प्रथम वर्ग, कोर्ट क्र. ५, बारामती येथील मा. टी. डी. इंगवले यांनी दि. ३१ जुलै २०२६ रोजी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. न्यायालयाने कलम ४२० अंतर्गत दोष सिद्ध मानला, तर कलम ४०६, ४६५, ४६८ आणि ४७१ मधील आरोप पुरेशा वैज्ञानिक पुराव्याअभावी सिद्ध न झाल्याने आरोपीस त्या आरोपांत संशयाचा लाभ देण्यात आला.

फिर्यादी बाळासाहेब दत्तात्रय रणसिंग यांच्या पत्नीचा २०१५ मध्ये मोटार अपघातात मृत्यू झाला होता. त्यानंतर नुकसानभरपाईचा दावा दाखल करण्यासाठी त्यांनी आरोपी वकिलाची नियुक्ती केली. नुकसानभरपाईची रक्कम मिळाल्यानंतर फिर्यादी व त्यांच्या मुलांच्या संयुक्त खात्यात पैसे जमा झाले.

अभियोग पक्षाच्या म्हणण्यानुसार, आरोपीने "वकिली फी म्हणून फक्त ₹१ लाख काढायचे आहेत" असे सांगून धनादेश व बँकेच्या कागदपत्रांवर सह्या घेतल्या. मात्र प्रत्यक्षात ₹१० लाख आरोपीच्या वैयक्तिक खात्यावर हस्तांतरित करण्यात आल्याचे प्रमाणित बँक अभिलेखातून स्पष्ट झाले.

युनियन बँकेच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयात सादर केलेल्या प्रमाणित खातेविवरणातून फिर्यादीच्या संयुक्त खात्यातून आरोपीच्या खात्यावर ₹१० लाख वर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. मौखिक साक्ष, बँक दस्तऐवज आणि परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने हा व्यवहार फसवणुकीचा असल्याचे मान्य केले.

न्यायालयाने स्पष्ट केले की, सही खरी असली तरी ती कोणत्या उद्देशाने घेतली गेली, हे अधिक महत्त्वाचे आहे. एखाद्या व्यक्तीला ₹१ लाख काढले जातील असे सांगून त्याच सहीचा वापर ₹१० लाख स्वतःच्या खात्यावर वळविण्यासाठी केला गेला, तर ती संमती स्वेच्छेची आणि पूर्ण माहितीवर आधारित मानता येत नाही.

मूळ धनादेश जप्त न करणे, हस्ताक्षर तज्ज्ञांचा अहवाल नसणे आणि काही तांत्रिक त्रुटींमुळे बनावट कागदपत्रांशी संबंधित आरोप सिद्ध झाले नाहीत. मात्र ₹१० लाखांच्या व्यवहाराबाबतचे बँक पुरावे आणि साक्षीदारांची साक्ष भक्कम असल्याने फसवणुकीचा गुन्हा सिद्ध झाला, असे न्यायालयाने नमूद केले.

या प्रकरणातील फिर्यादी बाळासाहेब रणसिंग यांचे मार्च २०२६ मध्ये निधन झाले. मात्र त्यांच्या मृत्यूनंतरही न्यायप्रक्रिया सुरू राहिली. पोलिसांनी साक्षीदारांचा पाठपुरावा केला, अभियोग पक्षाने प्रभावीपणे बाजू मांडली आणि अखेरीस न्यायालयाने आरोपीला शिक्षा सुनावली.

न्यायालयाने आरोपीला एक वर्ष सक्तमजुरी, ₹२५ हजार दंड, दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली. तसेच दंडाच्या रकमेतून ₹२० हजार फिर्यादीच्या कायदेशीर वारसांना नुकसानभरपाई म्हणून देण्याचे, तर ₹५ हजार शासनजमा करण्याचे आदेश दिले.

या निकालामुळे नागरिकांचा पोलीस आणि न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ झाला असून, व्यावसायिक विश्वासाचा गैरफायदा घेणाऱ्यांना कायदा माफ करत नाही, असे मत बारामती शहर पोलीस निरीक्षक चिवडशेट्टी यांनी व्यक्त केले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या