बारामती नगरपरिषदेकडून महिलांसाठी कौशल्य प्रशिक्षणाची संधी; पाच अभ्यासक्रमांत ७५० प्रशिक्षणार्थींना प्रवेश




प्रतिनिधी:

बारामती,दि.१३- : बारामती नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने शहरातील महिला व युवतींसाठी ‘प्रतिभा महिला प्रशिक्षण योजना’ अंतर्गत सन २०२६-२७ या वर्षासाठी विविध कौशल्याधारित प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. या उपक्रमांतर्गत एकूण ७५० प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.


नगरपरिषदेने प्रसिद्ध केलेल्या जाहिर आवाहनानुसार एम.एस.-सी.आय.टी., मराठी टायपिंग, इंग्रजी टायपिंग, फोटोग्राफी व व्हिडिओग्राफी एडिटिंग तसेच डिजिटल मार्केटिंग या पाच अभ्यासक्रमांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.


पाच अभ्यासक्रमांसाठी ७५० जागा


या प्रशिक्षणामध्ये प्रत्येक अभ्यासक्रमासाठी १५० प्रशिक्षणार्थी निवडले जाणार आहेत.


- एम.एस.-सी.आय.टी. – १५० जागा, कालावधी ३ महिने, शैक्षणिक पात्रता १०वी उत्तीर्ण.

- मराठी टायपिंग – १५० जागा, कालावधी ६ महिने, शैक्षणिक पात्रता १२वी उत्तीर्ण.

- इंग्रजी टायपिंग – १५० जागा, कालावधी ६ महिने, शैक्षणिक पात्रता १२वी उत्तीर्ण.

- फोटोग्राफी व व्हिडिओग्राफी एडिटिंग प्रशिक्षण – १५० जागा, कालावधी ९ महिने, शैक्षणिक पात्रता ८वी उत्तीर्ण.

- डिजिटल मार्केटिंग प्रशिक्षण – १५० जागा, कालावधी ९ महिने, शैक्षणिक पात्रता ९वी उत्तीर्ण.


या प्रशिक्षणामुळे महिलांना संगणक, टायपिंग, डिजिटल माध्यमे, फोटोग्राफी-व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल मार्केटिंग यांसारख्या रोजगाराभिमुख कौशल्यांचे प्रशिक्षण मिळणार आहे.


अर्जासाठी २७ ऑगस्टपर्यंत मुदत


प्रशिक्षणासाठी इच्छुक लाभार्थींनी नगरपरिषदेकडील विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे. अर्जाची किंमत २० रुपये असून प्रवेश अर्ज वाटपाची प्रक्रिया १२ ऑगस्ट २०२६ ते २७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत राहणार आहे. अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत २८ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत आहे.


प्रशिक्षणासाठी अर्ज प्राप्त झाल्यानंतर प्रशिक्षणार्थींच्या मुलाखती घेण्यात येणार असून, ३ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता महिला व बालकल्याण विभागामध्ये मुलाखती होणार असल्याचे नगरपरिषदेने स्पष्ट केले आहे.


निवड झालेल्या प्रशिक्षणार्थींना १० टक्के शुल्क


प्रशिक्षणासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड झाल्यानंतर संबंधित प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण शुल्काच्या १० टक्के रकमेचा भरणा करावा लागणार आहे. प्रशिक्षणासाठी ये-जा करण्याचा खर्च तसेच प्रशिक्षण स्थळी जाण्याचा व येण्याचा खर्च प्रशिक्षणार्थींनी स्वतः करायचा असल्याचे जाहिरातीत नमूद करण्यात आले आहे.


अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे


अर्जासोबत संबंधित शैक्षणिक पात्रतेनुसार उत्तीर्ण असल्याचे गुणपत्रक, रेशन कार्ड किंवा रहिवासी दाखला, ओळखपत्र (उदा. आधार कार्ड, मतदान ओळखपत्र किंवा परवाना पत्र यापैकी कोणतेही एक) अशी कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. अर्जदाराचे वय १५ ते ४५ वर्षे असावे. नावामध्ये बदल झालेला असल्यास महाराष्ट्र शासन राजपत्र किंवा प्रतिज्ञापत्र जोडणे आवश्यक असल्याचेही नगरपरिषदेने नमूद केले आहे.


एका कुटुंबातील एका व्यक्तीलाच लाभ


या योजनेच्या नियमांनुसार एका कुटुंबातील एका व्यक्तीलाच दोन प्रशिक्षणांपैकी लाभ घेता येईल. तसेच एकदा निश्चित करण्यात आलेली प्रशिक्षण संस्था कोणत्याही कारणास्तव बदलता येणार नाही आणि भरलेली प्रशिक्षण फी कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नसल्याचे जाहिरातीत स्पष्ट करण्यात आले आहे.


बारामती शहरातील महिला व युवतींना रोजगाराभिमुख कौशल्ये आत्मसात करून स्वावलंबी होण्यासाठी ही योजना उपयुक्त ठरण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे पात्र इच्छुकांनी अंतिम मुदतीपूर्वी अर्ज करून या प्रशिक्षण संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन बारामती नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाकडून करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या