फलटणमध्ये अवैध गुटखा विक्रीवर कारवाई करा; अन्यथा १५ ऑगस्टला आमरण उपोषण!






राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग अहिवळे यांचा पोलीस प्रशासनाला इशारा!

फलटण (विशेष प्रतिनिधी): दिनांक 5 ऑगस्ट 2026

फलटण शहरातील लक्ष्मीनगर परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर व प्रतिबंधित गुटख्याच्या घाऊक (होलसेल) विक्रीवर तात्काळ छापा टाकून कडक कारवाई करावी; अन्यथा येत्या १५ ऑगस्ट रोजी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा कडक इशारा राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष पांडुरंग समुद्रलाल अहिवळे यांनी दिला आहे. याबाबत त्यांनी फलटण शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना लेखी तक्रार अर्ज दिला आहे.

उघडपणे गुटख्याची घाऊक विक्री!

दिलेल्या तक्रार अर्जात अहिवळे यांनी नमूद केले आहे की, फलटण शहरातील लक्ष्मीनगर परिसरात व्यवसायाच्या ठिकाणी शासनाने आरोग्यास घातक म्हणून बंदी घातलेल्या विविध प्रकारच्या गुटख्यांची तसेच तंबाखूजन्य पदार्थांची मोठ्या प्रमाणावर घाऊक विक्री करत आहेत. महाराष्ट्र शासनाने गुटखा विक्रीवर पूर्णपणे बंदी घातलेली असतानाही हा बेकायदेशीर व्यवसाय उघडपणे सुरू आहे.

तरुणाई व्यसनाच्या आहारी;

या अवैध गुटखा विक्रीमुळे परिसरातील तरुणाई आणि नागरिक मोठ्या प्रमाणावर व्यसनाच्या जाळ्यात ओढले जात आहेत. त्यामुळे या परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. पोलीस प्रशासनाने या प्रकाराची तातडीने दखल घेऊन संबंधित ठिकाणी छापा टाकावा आणि अवैध गुटखा विक्री कायमची बंद पाडावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

प्रशासनाला १५ ऑगस्टचा अल्टीमेटम!

पोलीस प्रशासनाने या तक्रारीची वेळीच दखल न घेतल्यास, स्वातंत्र्यदिनी म्हणजेच १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार असल्याचे पांडुरंग अहिवळे यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे.

या तक्रार अर्जाच्या प्रती जिल्हा पोलीस प्रमुख (सातारा), उपविभागीय पोलीस अधिकारी (फलटण) आणि अन्न व औषध प्रशासन विभाग (सातारा) यांनाही पुढील कारवाईसाठी पाठवण्यात आल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या