अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई द्या; वंचित बहुजन आघाडीचे तहसीलदारांना निवेदन


चाळीसगाव | प्रतिनिधी,दि.५-:दि. ३० व ३१ जुलै २०२६ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे चाळीसगाव तालुक्यातील अनेक गावांतील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तात्काळ संयुक्त पंचनामे करून त्यांना शासनाकडून योग्य नुकसानभरपाई मिळावी, या प्रमुख मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी, चाळीसगाव तालुक्याच्या वतीने आज तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.


निवेदनात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांचे तातडीने संयुक्त पंचनामे करण्याची मागणी करण्यात आली. तसेच पात्र शेतकऱ्यांना त्वरित नुकसानभरपाई देणे, पीक विम्याचा लाभ मिळवून देणे, कृषी कर्जवसुलीस स्थगिती देणे आणि नुकसान झालेल्या शेती, शेतरस्ते व बांधांच्या पुनर्बांधणीसाठी विशेष निधी उपलब्ध करून देण्याची मागणी शासनाकडे करण्यात आली.


यावेळी वंचित बहुजन आघाडीचे चाळीसगाव तालुकाध्यक्ष संदीप अण्णा कांबळे, शहराध्यक्ष सागर जिभाऊ निकम, महासचिव गौतम रतन निकम, उपाध्यक्ष चेतन पवार, उपाध्यक्ष मनोज कमलाकर देशमुख यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते नारायण पाटील, प्रशांत मोरे, तुषार मोरे, प्रदीप मोरे, हेमराज पाटील, शुभम गुजर, शशिकांत सोनवणे, सागर धनगर तसेच वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


शेतकऱ्यांच्या मागण्यांवर तातडीने कार्यवाही न झाल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी प्रशासनाला दिला.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या