बारामतीच्या अथर्व पवारची UPSC-CAPF परीक्षेत चमकदार कामगिरी; ऑल इंडिया रँक ३२

BE Mechanical शिक्षण घेतलेल्या अथर्व पवारची Assistant Commandant पदासाठी निवड; कुटुंबीयांसह बारामतीकरांकडून अभिनंदनाचा वर्षाव



बारामती | प्रतिनिधी

दि.८-:बारामतीच्या सायली हिल परिसरातील अथर्व सुनीता प्रदीप पवार याने केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (UPSC) घेण्यात आलेली CAPF (Central Armed Police Forces) Assistant Commandant (Class-I) पदाची परीक्षा ऑल इंडिया रँक ३२ मिळवत यशस्वीरीत्या उत्तीर्ण केली आहे. अथर्वच्या या उल्लेखनीय यशामुळे बारामतीच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात त्याचे कौतुक होत असून, त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


अथर्व पवार याचे शालेय शिक्षण बारामती येथील विनोदकुमार गुजर बाल विकास मंदिर येथे झाले. त्यानंतर त्याने पुणे येथील पुणे विद्यार्थी गृह येथून BE Mechanical ही अभियांत्रिकी पदवी पूर्ण केली. अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतर केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील अधिकारी होण्याचे ध्येय ठेवून त्याने UPSC-CAPF परीक्षेची तयारी केली. कठोर परिश्रम, सातत्य आणि ध्येयाप्रती असलेल्या जिद्दीच्या जोरावर त्याने देशपातळीवर ३२ वा क्रमांक मिळवला.


CAPF मधील Assistant Commandant हे Class-I अधिकारी पद असून, या पदासाठी देशभरातून मोठ्या संख्येने उमेदवार परीक्षा देतात. अशा स्पर्धात्मक परीक्षेत ऑल इंडिया रँक ३२ मिळवणे ही अथर्वच्या मेहनतीची आणि गुणवत्तेची पावती मानली जात आहे.


अथर्वच्या यशामागे त्याच्या कुटुंबीयांचे मोठे योगदान आहे. त्याची आई श्रीमती सायरस पूनावाला इंग्लिश मीडियम स्कूल, बारामती येथे शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. तर त्याचे वडील पियाजिओ व्हेहिकल प्रायव्हेट लिमिटेड, बारामती येथे डेप्युटी जनरल मॅनेजर पदावरून निवृत्त झाले आहेत.


अथर्वने मिळवलेल्या या यशामुळे पवार कुटुंबीयांसह त्याचे शिक्षक, मित्रपरिवार आणि बारामतीकरांना अभिमान वाटत आहे. त्याच्या या यशातून ग्रामीण व निमशहरी भागातील विद्यार्थ्यांनीही मोठी स्वप्ने पाहून स्पर्धात्मक परीक्षांच्या माध्यमातून देशसेवेत पुढे यावे, असा प्रेरणादायी संदेश मिळत आहे.


अथर्व पवारच्या या उल्लेखनीय यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून, भावी सेवेसाठी त्याला शुभेच्छा दिल्या जात आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या