एलपीजी पंप सुरू करा, सीएनजी पंपावर रिक्षांसाठी स्वतंत्र रांग द्या;

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर ऑटो रिक्षा संघटनेचे तहसीलदारांना निवेदन



फलटण | प्रतिनिधी (संजय मोरे)

दि.२८-:भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ऑटो रिक्षा संघटना, फलटण यांच्या वतीने बारामती रोडवरील महादेवनगर येथील बंद अवस्थेतील एलपीजी पंप तातडीने सुरू करावा तसेच सीएनजी पंपावर रिक्षांसाठी स्वतंत्र रांग सुरू करण्यात यावी, या प्रमुख मागण्यांसह तहसीलदार तथा पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी तहसीलदारांनी संघटनेच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेत पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.


संघटनेने दिलेल्या निवेदनात पुढील प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत—


1. बारामती रोडवरील बंद अवस्थेतील एलपीजी पंप तातडीने सुरू करण्यात यावा.

2. फलटणमध्ये वाढत्या रिक्षा संख्येचा विचार करून नवीन एलपीजी पंप मंजूर करण्यात यावा.

3. सीएनजी पंपावर रिक्षांसाठी स्वतंत्र रांग सुरू करण्यात यावी.

4. नवीन रिक्षा खरेदी करणाऱ्या तसेच २०१८ मध्ये एलपीजी रिक्षा घेतलेल्या चालकांना सीएनजी किट बसविण्यासाठी शंभर टक्के अनुदान देण्यात यावे.


निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, एलपीजी पंप बंद असल्यामुळे एलपीजी रिक्षाचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पेट्रोलवर रिक्षा चालवणे आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने अनेक रिक्षा घरासमोरच बंद अवस्थेत उभ्या राहत आहेत. त्यामुळे चालकांना कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे आणि वाहनांचे हप्ते भरणे कठीण झाले आहे.


दुसरीकडे सीएनजी रिक्षाचालकांनाही मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सीएनजी पंपावर तासन्तास रांगेत उभे राहूनही अनेकदा गॅस संपल्यामुळे रिकाम्या हाताने परतावे लागते. त्यामुळे त्यांच्यावरही आर्थिक संकट ओढवले असून उपासमारीची वेळ येत असल्याचे संघटनेने म्हटले आहे.


रिक्षाचालकांच्या समस्या तातडीने सोडविण्यासाठी प्रशासनाने शासनस्तरावर प्रयत्न करावेत. अन्यथा रिक्षा संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन तसेच उपोषण करण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.


यावेळी संघटनेचे अध्यक्ष दिनेश अहिवळे, उपाध्यक्ष सनी कदम, दादा काकडे, पत्रकार संजय मोरे, फिरोज शेख, बिलाल शेख, सतीश माने, निलेश गायकवाड, उदय मिसाळ, विजू मठपती, सतीश इंगळे तसेच संघटनेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या