फलटण तालुक्यातील नांदल येथे बेकायदेशीर स्टोन क्रशरमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात; जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार!


फलटण: [प्रतिनिधी] 04 मे 2026,

तालुक्यातील मौजे नांदल येथील 'प्रसाद स्टोन क्रशर'च्या अगदी समोर नियमांचे उल्लंघन करून एक नवीन स्टोन क्रशर राजरोसपणे सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या क्रशरमुळे परिसरातील शेती, पर्यावरण आणि स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचे अतोनात नुकसान होत असून, या बेकायदेशीर स्टोन क्रशरवर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी फलटण येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. पांडुरंग समुद्रलाल अहिवळे यांनी सातारा जिल्हाधिकार्‍यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

या संदर्भातील तक्रार अर्ज ३ जून २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल करण्यात आला असून, त्याच्या प्रती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (सातारा), प्रांत अधिकारी (फलटण) आणि तहसीलदार (फलटण) यांनाही आवश्यक त्या कारवाईसाठी पाठवण्यात आल्या आहेत.

शेती उद्ध्वस्त, नागरिकांना श्वसनाचे आजार!

तक्रारदार पांडुरंग अहिवळे यांनी निवेदनात नमूद केले आहे की, सदर स्टोन क्रशरवर दगड फोडताना कोणत्याही प्रकारे पाण्याच्या फवाऱ्याचा वापर केला जात नाही. परिणामी, संपूर्ण परिसरात प्रचंड प्रमाणात धुळीचे लोट हवेत पसरत आहेत. या घातक धुळीमुळे आजूबाजूच्या शेतातील पिकांवर धुळीचे जाड थर साचून पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत.

या तीव्र वायुप्रदूषणामुळे स्थानिक नागरिक, लहान मुले आणि वृद्धांना श्वसनाचे गंभीर आजार, दमा आणि डोळ्यांचे विकार जडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

बेकायदेशीर वाहतूक आणि अपघातांचा धोका;

क्रशरच्या ठिकाणी दिवस-रात्र अवजड डंपर आणि हायवा गाड्यांची बेकायदेशीर व विनापरवाना वाहतूक सुरू असते. या अवजड वाहनांमुळे परिसरातील रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली असून, दिवसभर होणाऱ्या या वाहतुकीमुळे अपघातांचा धोका कमालीचा वाढला आहे.

प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांना हरताळ!

सदर क्रशर चालकाकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कोणत्याही नियमांचे पालन केले जात नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच, उपलब्ध जीपीएस (जिओ टॅगिंग) फोटोंवरून हे क्रशर पूर्णपणे नियमबाह्य आणि बेकायदेशीररी्या चालवले जात असल्याचे पुराव्यांसह उघड झाले आहे.

नागरिकांच्या मुख्य मागण्या:

प्रशासनाने तातडीने घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन क्रशरकडे आवश्यक असणारे शासकीय परवाने उपलब्ध आहेत का, याची तपासणी करावी.

प्रदूषण नियंत्रण नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सदर क्रशरचे काम तात्काळ 'स्टॉप वर्क' (काम बंद) आदेश देऊन थांबवावे.

संबंधित बेजबाबदार क्रशर चालकावर कठोर दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्यात यावी.

स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांच्या उपजीविकेचा व आरोग्याचा विचार करून प्रशासनाने या गंभीर प्रकरणाची तात्काळ दखल घ्यावी आणि अवैध क्रशरवर कडक कारवाई करावी, अशी आग्रही मागणी आता परिसरातून होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या