आपत्ती व्यवस्थापनासाठी सातारा सज्ज! अधिकारी, पोलीस व गृहरक्षक दलाला विशेष प्रशिक्षण


सातारा, दि. ४ जून २०२६: सातारा जिल्हा पूरप्रवण क्षेत्र असल्याने अतिवृष्टी, पूर, दरड कोसळणे, भूस्खलन, वादळी वारे, झाडे उन्मळून पडणे, विद्युत तारा तुटणे, इमारती कोसळणे, भूकंप तसेच इतर नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तींचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन किटच्या वापराबाबत विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.


राधिका रोड, सातारा येथील मल्टीपर्पज हॉलमध्ये गुरुवारी (दि. ४ जून) आयोजित करण्यात आलेल्या या प्रशिक्षण व प्रात्यक्षिक कार्यक्रमात जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष संतोष पाटील, पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर तसेच प्रभारी पोलीस उपअधीक्षक (गृह) अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण पार पडले.


महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत उपलब्ध करून देण्यात आलेल्या आपत्ती व्यवस्थापन किटमधील विविध साहित्याचा वापर, त्याची हाताळणी आणि शोध व बचाव कार्यातील उपयुक्तता याबाबत उपस्थितांना सविस्तर माहिती देण्यात आली. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी देविदास ताम्हाणे, पोलीस उपनिरीक्षक सुवर्णा काटकर आणि जिल्हा विशेष शाखेतील अधिकाऱ्यांनी प्रशिक्षणाचे समन्वयन केले.


यशदा, पुणे येथील आपत्ती व्यवस्थापन केंद्राचे मुख्य प्रशिक्षक विवेक नायडू आणि मास्टर ट्रेनर अब्दुलकादर महाजन यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांतील अधिकारी, कर्मचारी आणि गृहरक्षक दलाच्या जवानांना आपत्ती व्यवस्थापन किटचा प्रभावी वापर, आपत्कालीन परिस्थितीतील प्रतिसाद आणि बचाव कार्याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले.


प्रशिक्षकांनी विविध आपत्तीजन्य परिस्थितींमध्ये तात्काळ प्रतिसाद कसा द्यावा, बचाव साहित्याचा सुरक्षित वापर कसा करावा आणि नागरिकांचे जीवित व मालमत्तेचे नुकसान कमी करण्यासाठी कोणती खबरदारी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले.


आपत्तीच्या प्रसंगी जलद, प्रभावी आणि समन्वयपूर्ण प्रतिसाद देण्यासाठी अशा प्रकारचे प्रशिक्षण अत्यंत उपयुक्त ठरणार असून जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग आणि गृहरक्षक दलाची आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याची क्षमता अधिक सक्षम होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.उपशीर्षक: पूर, भूस्खलन आणि नैसर्गिक संकटांचा सामना करण्यासाठी प्रशासनाची तयारी अधिक भक्कम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या