सातारा/फलटण: [प्रतिनिधी] 04 मे 2026,
फलटण शहरातील मंगळवार पेठ, कुरेशीनगर येथील नगर परिषदेच्या मालकीच्या कत्तलखान्यामध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांचे उघड उल्लंघन होत असून, हा बेकायदेशीर कत्तलखाना तातडीने बंद करावा, अशी मागणी करणारा लेखी अर्ज सातारा जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला आहे. फलटण येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. पांडुरंग समुद्रलाल अहिवळे यांनी हा तक्रार अर्ज दाखल केला आहे.
'ETP' प्लँट नसतानाही हजारो जनावरांची बेकायदेशीर कत्तल
माहिती अधिकारातून (RTI) प्राप्त झालेल्या अधिकृत कागदपत्रांच्या आधारे हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (MPCB) नियमानुसार कत्तलखान्यातून निघणाऱ्या घनकचरा व द्रवरूप टाकाऊ पदार्थांच्या विल्हेवाटीसाठी Effluent Treatment Plant (ETP) असणे अनिवार्य आहे. मात्र, फलटण नगर परिषदेच्या या कत्तलखान्यात असा कोणताही प्लँट अस्तित्वात नाही.
असे असतानाही, सन २०१९ ते २०२५ या कालावधीत तब्बल ३,००० हून अधिक जनावरांची बेकायदेशीर व अवाजवी कत्तल करण्यात आल्याचे नगर परिषदेच्या भरणा रजिस्टरवरून स्पष्ट झाले आहे.
नियमांची उघड पायमल्ली आणि पर्यावरणाचा ऱ्हास
नियमानुसार प्रतिदिन मर्यादित जनावरांची कत्तल करण्याची परवानगी असताना, काही विशिष्ट दिवसांत शेकडो जनावरे कापली गेल्याची नोंद आहे. उदा. १२/८/२०१९ रोजी ८९ जनावरे, २९/६/२०२३ रोजी १०४ जनावरे, आणि ७/६/२०२५ रोजी तब्बल १२६ जनावरांची कत्तल करण्यात आली.
तक्रारीत नमूद गंभीर बाबी:
जलप्रदूषण व दुर्गंधी: कत्तलखान्यातील रक्त, दूषित पाणी आणि टाकाऊ अवशेष उघड्यावर तसेच जवळच्या जलस्रोतांमध्ये सोडले जात आहेत. यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
कायद्याचे उल्लंघन: महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम, १९६५ च्या कलम २६६(२) नुसार हा कत्तलखाना बेकायदेशीर ठरत असल्याचा दावा अर्जात करण्यात आला आहे.
मुख्य मागण्या:
१. कुरेशीनगर, मंगळवार पेठ येथील हा बेकायदेशीर कत्तलखाना कायमचा बंद करण्यात यावा.
२. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांचे उल्लंघन करून बेकायदेशीर कत्तलीस जबाबदार असणारे अधिकारी आणि गाळेधारकांवर कठोर कायदेशीर गुन्हे दाखल व्हावेत.
३. फलटणकरांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी प्रशासनाने यावर अतितातडीने कारवाई करावी.
या अर्जाची प्रत माहिती व योग्य त्या कारवाईसाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक व उपप्रादेशिक अधिकारी, प्रांत अधिकारी आणि फलटण नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनाही पाठवण्यात आली आहे. आता यावर जिल्हाधिकारी काय पाऊल उचलतात, याकडे फलटणकरांचे लक्ष लागले आहे.

0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज