कल्याण ,दि.३-: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील वालधुनी येथील अशोक नगर परिसरात बुद्धभूमी फाउंडेशनच्या वतीने उभारण्यात आलेल्या विपश्यना केंद्र, ध्यान केंद्र, पाली भाषा अध्ययन केंद्र तसेच भगवान बुद्धांची मूर्ती, भीमा कोरेगाव विजयस्तंभाची प्रतिकृती आणि अशोक स्तंभ यांच्यावर महानगरपालिका प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात जेसीबीद्वारे कारवाई केल्याने बौद्ध समाजात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचा निषेध करत विविध बौद्ध संघटना, भिक्खू संघ आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, सुमारे 31 गुंठे जागेवर उभारण्यात आलेले हे केंद्र केवळ धार्मिक स्थळ नसून बौद्ध समाजाच्या सांस्कृतिक, शैक्षणिक आणि आध्यात्मिक कार्याचे महत्त्वाचे केंद्र होते. येथे नियमितपणे विपश्यना शिबिरे, ध्यानसाधना, पाली भाषा प्रशिक्षण तसेच सामाजिक उपक्रम राबविले जात होते.
कारवाईदरम्यान बुद्धमूर्ती, अशोक स्तंभ आणि भीमा कोरेगाव विजयस्तंभाच्या प्रतिकृतीचे नुकसान झाल्याचा आरोप करण्यात येत असून, त्यामुळे बौद्ध समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. महानगरपालिका प्रशासनाने कोणतीही पूर्वसूचना अथवा पुरेसा वेळ न देता ही कारवाई केल्याचा आरोप करण्यात येत आहे.
संतप्त नागरिकांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांच्यावर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह संबंधित कायद्यांअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि आयुक्तांना तात्काळ निलंबित करावे, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.
या प्रकरणात स्थानिक लोकप्रतिनिधींवरही टीकेची झोड उठविण्यात आली आहे. निवडणुकांच्या काळात मतांसाठी जनतेसमोर येणारे नगरसेवक, महापौर, आमदार आणि खासदार अशा संवेदनशील प्रश्नांवर मात्र मौन बाळगतात, असा आरोप नागरिकांनी केला. जर उड्डाणपुलाच्या कामासाठी जागेची आवश्यकता होती, तर संबंधित धार्मिक स्थळ हटविण्यापूर्वी पर्यायी सरकारी जागा उपलब्ध करून तेथे सर्व सुविधांनी सुसज्ज भव्य बुद्ध विहार उभारण्याची व्यवस्था करणे आवश्यक होते, असे मत बौद्ध समाजातील प्रतिनिधींनी व्यक्त केले.
तसेच, महानगरपालिका सभागृहात ठराव मंजूर करून बुद्ध विहाराची जागा अधिकृत करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यायला हवा होता. योग्य नियोजन आणि समन्वय साधला असता तर हा वाद टाळता आला असता आणि समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या नसत्या, असेही आंदोलकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ विविध संघटनांकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आला असून दोषींवर कारवाई होईपर्यंत संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे कल्याण-डोंबिवली परिसरातील सामाजिक आणि राजकीय वातावरण तापले असून प्रशासनाची भूमिका काय राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज