नवी दिल्ली, प्रतिनिधी दि.६- : दिल्लीतील जंतर-मंतर येथे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या विरोधात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनात कॉक्रोज जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी भावनिक भाषण करत केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. त्यांच्या वक्तव्याने आंदोलनस्थळी उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण झाला असून सोशल मीडियावरही त्याची मोठी चर्चा सुरू आहे.
अभिजीत दीपके यांनी आपल्या भाषणात सांगितले की, "माझ्या आईला खूप भीती वाटत होती की हे सरकार मला तुरुंगात टाकेल. या देशात जेव्हा एखादं मूल सरकारविरोधात आवाज उठवतं, तेव्हा प्रत्येक आईला आपल्या मुलाच्या सुरक्षिततेची चिंता वाटते." त्यांच्या या वक्तव्याने आंदोलनस्थळी काही काळ भावनिक वातावरण निर्माण झाले.
देशभरात NEET परीक्षा, शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित प्रश्न आणि शैक्षणिक धोरणांविरोधात विद्यार्थ्यांचा रोष वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर दिल्लीतील जंतर-मंतर येथे हजारो विद्यार्थी आणि युवक एकत्र येत आंदोलन करत आहेत. आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे की, शिक्षण व्यवस्थेतील गंभीर समस्यांकडे सरकार दुर्लक्ष करत असून विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने पाहिले जात नाही.
अभिजीत दीपके यांनी आपल्या भाषणात लोकशाही व्यवस्थेत मतभिन्नता व्यक्त करण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला असल्याचे सांगत, विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्याचा कोणताही प्रयत्न लोकशाहीसाठी घातक ठरेल, असे मत व्यक्त केले. त्यांनी विद्यार्थ्यांना शांततापूर्ण आणि संविधानिक मार्गाने संघर्ष सुरू ठेवण्याचे आवाहन केले.
दरम्यान, दीपके यांच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर विविध प्रतिक्रिया उमटत असून समर्थकांनी त्यांचे कौतुक केले आहे, तर विरोधकांनी त्यांच्या विधानावर टीका केली आहे. त्यामुळे जंतर-मंतरवरील आंदोलन आणि अभिजीत दीपके यांचे वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरले आहे.

0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज