फलटण, प्रतिनिधी,दि.७- : फलटण शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, भीम आर्मी संघटनेच्या वतीने फलटण नगरपालिका प्रशासन व नगराध्यक्षांना स्मरण निवेदन देत शहर खड्डेमुक्त करण्याची मागणी करण्यात आली आहे. नगराध्यक्षांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या एका महिन्यात शहरातील प्रमुख रस्ते खड्डेमुक्त करण्याचे आश्वासन नागरिकांना दिले होते. मात्र एक महिना उलटूनही शहरातील रस्त्यांची अवस्था पूर्वीप्रमाणेच असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
भीम आर्मीच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या फलटण शहरातील अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून नागरिकांना दररोज त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्याची सुरुवात होत असल्याने या खड्ड्यांमध्ये पाणी साचत आहे. त्यामुळे वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज येत नसल्याने किरकोळ अपघातांचे प्रमाण वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
खड्ड्यांमुळे वाहतुकीवरही परिणाम होत असून अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. विशेषतः शाळकरी विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच रुग्णांना याचा मोठा फटका बसत आहे. रस्त्यांच्या खराब अवस्थेमुळे नागरिकांच्या आरोग्याला व सुरक्षिततेलाही धोका निर्माण झाला असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
नगराध्यक्षांनी नागरिकांना दिलेले आश्वासन पूर्ण करून तात्काळ रस्ते दुरुस्तीची कामे सुरू करावीत, अन्यथा भीम आर्मी संघटनेच्या वतीने दि. १३ जून २०२६ रोजी नगरपालिका कार्यालयासमोर "खड्डेमुक्ती आक्रोश आंदोलन" करण्यात येईल, असा इशाराही संघटनेने दिला आहे.
यावेळी अजित संभाजी मोरे, सुनील पवार, तुषार जाधव, सनी पवार आणि तेजस भोसले आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज