फलटण तालुक्यातील आळजापूर येथील 'संतकृपा महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थे'मध्ये एक धक्कादायक आणि गंभीर प्रकार समोर आला आहे. एका गरीब मजुराच्या नावावर केवळ ५७,५०० रुपयांचे कर्ज दिलेले असताना, पतसंस्थेने कागदपत्रांमध्ये फेरफार करून तब्बल १,७५,५०० रुपयांचे बोगस कर्ज दाखवल्याचा आरोप झाला आहे. या आर्थिक फसवणुकीबाबत आणि बोगस कर्ज प्रकरणाबाबत जाब विचारण्यासाठी गेलेल्या कर्जदाराला पतसंस्थेच्या कार्यालयातच चेअरमन आणि सहकाऱ्यांनी बेदम मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपमानास्पद वागणुकीला आणि त्रासाला कंटाळून पीडित कर्जदाराने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने फलटण परिसरात खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी ताथवडे (ता. फलटण) येथील रहिवासी असलेले पीडित कर्जदार श्री. फारुख मुबारक सय्यद यांनी फलटणचे सहाय्यक निबंधक (सहकारी संस्था) यांच्याकडे लेखी तक्रार अर्ज दाखल केला असून दोषींवर कठोर फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली आहे.
तक्रार अर्जातील माहितीनुसार, फारुख मुबारक सय्यद यांनी आळजापूर येथील संतकृपा महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेकडून प्रत्यक्षात केवळ ५७,५०० रुपये कर्ज घेतले होते. ते या कर्जाची नियमित परतफेड करण्यासही तयार होते. मात्र, पतसंस्थेच्या कर्ज खाते उताऱ्यामध्ये त्यांची एकूण कर्ज रक्कम १,७५,५०० रुपये दाखवण्यात आली.
तसेच, दिनांक ०३/०६/२०१९ रोजी त्यांच्या संमतीशिवाय आणि कोणतीही रक्कम हातामध्ये न देता १,१८,००० रुपयांची अतिरिक्त बोगस उचल (नावे टाकून) दाखवण्यात आली. या कर्ज प्रकरणाचे मूळ पासबुक किंवा अंतर्गत हिशोबाचे पुस्तकही पतसंस्थेने त्यांना कधीही दिले नाही.तसेच या रकमेचे व्याज पकडून आज पर्यंत ७०००००/- रुपये संस्थेतील श्री रणदिवे यांनी मागितले आहेत..
कार्यालयातच मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी!
दिनांक ०२ जून २०२६ रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास फारुख सय्यद हे आपल्या जामीनदारासह या बोगस कर्ज प्रकरणाची अधिकृत माहिती घेण्यासाठी आणि खातरजमा करण्यासाठी पतसंस्थेच्या कार्यालयात गेले होते. तेथे हिशोबाबाबत विचारणा केली असता, पतसंस्थेचे चेअरमन श्री. विलास नामदेव नलवडे आणि श्री. मारुती बबन रणदिवे यांनी त्यांना कार्यालयातच बेदम मारहाण केली. तसेच "इथून चालता हो, नाहीतर जीवे मारीन" अशी धमकी देऊन त्यांना पतसंस्थेतून हाकलून दिले.
अपमानामुळे कर्जदाराचा आत्महत्येचा प्रयत्न!
फारुख सय्यद हे सर्वसामान्य रोजंदारीवर काम करणारे मजूर असून या बोगस कर्ज वाढीमुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. पतसंस्थेत झालेल्या बेदम मारहाणीमुळे आणि गंभीर अपमानामुळे मानसिक धक्का बसल्याने त्यांनी टोकाचे पाऊल उचलत विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुदैवाने वेळेत वैद्यकीय उपचार मिळाल्यामुळे त्यांचे प्राण वाचले आहेत. "माझ्या कुटुंबाला किंवा माझ्या जीवितास काही बरे-वाईट झाल्यास संबंधित पतसंस्थेचे चेअरमन आणि अधिकारी जबाबदार राहतील," असे सय्यद यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
सहाय्यक निबंधकांकडे दाद; कठोर कारवाईची मागणी!
या संपूर्ण फसवणुकीनंतर फारुख सय्यद यांनी आपल्या कुटुंबासह फलटणच्या सहाय्यक निबंधक कार्यालयात जाऊन लेखी तक्रार अर्ज सुपूर्द केला आहे. या तक्रारीसोबत त्यांनी बोगस कर्ज खाते उतारा, मंडळ अधिकारी वाठार निंबाळकर यांचे पत्र आणि पतसंस्थेची अंतिम नोटीस जोडली आहे.
तक्रारदाराची प्रमुख मागणी:
१. संतकृपा महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या संपूर्ण कारभाराची सखोल चौकशी व्हावी.
२. बेकायदेशीर व बोगस कर्ज प्रकरण तयार करणाऱ्या चेअरमन आणि संचालक मंडळावर फौजदारी व प्रशासकीय गुन्हे दाखल करण्यात यावेत.
३. पतसंस्थेकडून सुरू असलेली बेकायदेशीर जप्ती/वसुली प्रक्रिया तात्काळ थांबवून न्याय मिळावा.
४. पतसंस्थेकडील बँक स्टेटमेंट व सदर खात्याचे पासबुक मिळून यावे.
या गंभीर प्रकरणामुळे सहकार क्षेत्रात बोगस कर्ज प्रकरणांचा आणि कर्जदारांच्या पिळवणुकीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, आता सहाय्यक निबंधक आणि पोलीस प्रशासन संबंधित दोषींवर काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज