"मातंग-बौद्ध संघर्ष पेटविण्याचा डाव हाणून पाडू; बांधवांवर अन्याय होऊ देणार नाही – संजय गाडे"

उपवर्गीकरणाच्या वादावरून समाजात द्वेष पसरविणाऱ्यांवर टीका; रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट)च्या सहविचार सभेत भूमिका स्पष्ट



सातारा (अनिल वीर )दि.५- : मातंग आणि बौद्ध समाज हे परिवर्तनवादी व क्रांतिकारक विचारांचे समाज असून, उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावरून समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही. गुण्यागोविंदाने राहणाऱ्या बांधवांवर अन्याय होणार नाही, याची जबाबदारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट) घेईल, असा ठाम विश्वास पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय गाडे यांनी व्यक्त केला.


सातारा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट)ची महत्वपूर्ण सहविचार सभा पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी शहर विभागीय जिल्हाध्यक्ष गणेश भिसे होते. यावेळी आरक्षणातील उपवर्गीकरणाचा प्रश्न आणि जातीयवादी शक्तींचे राजकारण या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.


मार्गदर्शन करताना संजय गाडे म्हणाले की, राज्यात उपवर्गीकरणाच्या मुद्यावरून मातंग आणि बौद्ध समाजामध्ये संघर्षाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. काही जातीयवादी शक्तींना हा प्रश्न मूळ मुद्द्यापासून भरकटवून सामाजिक तेढ निर्माण करण्यासाठी वापरायचा आहे. हे सर्वांना माहीत असतानाही काही स्वार्थी व बाजारू नेते जाणूनबुजून समाजात द्वेष पसरविण्याचे काम करत आहेत. ही बाब अत्यंत गंभीर असून समाजाने अशा प्रवृत्तींना बळी पडू नये, असे आवाहन त्यांनी केले.


यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजेंद्र गवई यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्ह्यात पक्षाची भूमिका काय असावी, यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. समाजातील ऐक्य अबाधित ठेवत संविधानिक मार्गाने न्यायासाठी संघर्ष करण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला.


तसेच शिवराज्याभिषेक दिनापासून सुरू होणाऱ्या आत्मक्लेश आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरही विविध मुद्द्यांवर विचारमंथन करण्यात आले. आगामी आंदोलनाची दिशा, संघटनात्मक बांधणी आणि जनजागृती मोहिमांबाबत पदाधिकाऱ्यांनी आपली मते मांडली.


या सहविचार सभेस जिल्ह्यातील विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेत सामाजिक ऐक्य, संविधानिक हक्कांचे संरक्षण आणि अन्यायाविरुद्ध संघटित लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या