बारामती, प्रतिनिधी,दि.५- : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा आणि कांद्याला हमीभाव जाहीर करावा या प्रमुख मागणीसाठी बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठा मोर्चा काढत प्रशासनाचे लक्ष वेधले. या आंदोलनात युगेंद्रदादा पवार यांनी सक्रिय सहभाग घेत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ठाम भूमिका मांडली.
सध्या बाजारात कांद्याचे दर घसरल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. उत्पादन खर्च वाढत असताना बाजारभाव मात्र अत्यंत कमी मिळत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर बारामती तालुक्यातील विविध भागांतील शेतकरी एकत्र येत कांद्याला हमीभाव देण्याची मागणी करत रस्त्यावर उतरले.
मोर्चादरम्यान शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करत शासनाच्या धोरणांविरोधात नाराजी व्यक्त केली. कांदा उत्पादकांना न्याय मिळावा, उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव जाहीर करावा तसेच शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय तातडीने घ्यावेत, अशी मागणी आंदोलकांनी केली.
यावेळी युगेंद्रदादा पवार म्हणाले की, "शेतकरी हा देशाचा कणा आहे. कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी हा लढा सुरू असून शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा. अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल."
मोर्चामध्ये मोठ्या संख्येने शेतकरी, कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते. आंदोलनामुळे बारामती परिसरात काही काळ वातावरण तापले होते. शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत प्रशासनाला निवेदन देण्यात आले असून शासनाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज