बारामती प्रतिनिधी ,दि.१५-: पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या माळेगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अवैध शस्त्रास्त्रांविरोधात मोठी कारवाई करत एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. आरोपीकडून दोन गावठी पिस्तुले, एक रायफल, दोन जिवंत काडतुसे आणि वापरलेल्या काडतुसांच्या पुंगळ्या जप्त करण्यात आल्या असून या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलीस प्रशासनाकडून मालमत्तेविरोधातील व गंभीर गुन्ह्यांतील सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार माळेगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी कुलदीप संकपाळ यांना १३ जून २०२६ रोजी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, अक्षय कल्याण तावरे (वय ३५, रा. वाघवस्ती, सांगवी, ता. बारामती) हा व्यक्ती गावठी पिस्तुलांसह संशयास्पदरीत्या फिरत आहे.
मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शोध पथकाने सांगवी गावात सापळा रचला. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. अंगझडतीदरम्यान त्याच्याकडून दोन गावठी बनावटीची पिस्तुले, दोन जिवंत काडतुसे व दोन वापरलेल्या काडतुसांच्या पुंगळ्या आढळून आल्या.
यानंतर पोलिसांनी आरोपीच्या राहत्या घरी झडती घेतली असता घरालगतच्या गोठ्यात लपवून ठेवलेली एक रायफल जप्त करण्यात आली. चौकशीदरम्यान आरोपीने ही शस्त्रे मध्य प्रदेशातून आणल्याची कबुली दिली. तसेच पिस्तुलांची चाचणी घेण्यासाठी शिरवली परिसरातील निर्जन भागात गोळीबार केल्याची माहितीही समोर आली आहे.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध माळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १५४/२०२६ अन्वये भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ च्या कलम ३/२५, ५/२५ व २७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने आरोपीला १६ जून २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांच्या तपासात आरोपीवर यापूर्वीही पुणे, सातारा व इतर जिल्ह्यांमध्ये मालमत्तेविरोधातील तसेच गंभीर स्वरूपाचे एकूण २६ गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे.
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली माळेगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी कुलदीप संकपाळ तसेच गुन्हे शोध पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यशस्वीरित्या पार पाडली.

0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज