जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कुरनेश्वर परिसरात वृक्षारोपण; वृक्षप्रेमींच्या कार्याचे कौतुक
अनिल वीर
सातारा,दि.५- : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेणे आवश्यक असून वृक्षारोपणाबरोबरच वृक्षसंवर्धनाची जबाबदारीही तितकीच महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन एस.डी. अकॅडेमीच्या ले. आर. एम. जोशी यांनी केले.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कुरनेश्वर मॉर्निंग ग्रुप, जाइन्ट्स व विविध वृक्षप्रेमी संघटनांच्या वतीने कुरनेश्वर परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमात बोलताना ले. जोशी यांनी वृक्षप्रेमींनी सातत्याने राबविलेल्या वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन उपक्रमांचे कौतुक करत पर्यावरण संरक्षणासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
यावेळी सातारा नगरपालिकेच्या स्वच्छता व आरोग्य समितीचे सभापती धनंजय जांभळे म्हणाले, "वृक्षसंवर्धनासाठी आवश्यक असणारे पाणी व इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. तसेच परिसरात ओपन जिम उभारण्यासाठी लोकसहभागातून प्रयत्न करण्यात येतील."
कार्यक्रमादरम्यान उपस्थितांचे वाढदिवसही उत्साहात साजरे करण्यात आले. अनिल कांबळे यांनी सादर केलेल्या गाण्यांच्या मैफिलीने उपस्थित वृक्षप्रेमींना मंत्रमुग्ध केले.
या कार्यक्रमास डीसीसी बँकेचे व्यवस्थापक झोरे, आरोग्य निरीक्षक क्षिरसागर, प्रकाश, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला तसेच मोठ्या संख्येने वृक्षप्रेमी उपस्थित होते. मॉर्निंग ग्रुपचे उपाध्यक्ष अनिल वीर, प्रकाश बडदरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश खंडझोडे यांनी केले, तर ॲड. सुनील सपकाळ यांनी आभार प्रदर्शन केले.
पर्यावरण संरक्षणाचा संदेश देणारा हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज