"साडेपाच महिने अल्पवयीन मुलगी बेपत्ता; पालकांच्या आक्रोशानंतर आमदार रोहित पवार मैदानात, पोलिसांना तातडीच्या तपासाचे आदेश देण्याची मागणी"



पिंपरी-चिंचवड,दि.५- : सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका सामान्य कुटुंबातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना घडून तब्बल साडेपाच महिने उलटले तरी मुलीचा शोध लागलेला नाही. याप्रकरणी गुन्हा दाखल असूनही तपासात होत असलेल्या दिरंगाईमुळे मुलीच्या कुटुंबीयांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.


मुलीच्या शोधासाठी तिचे आई-वडील गेल्या अनेक महिन्यांपासून सांगवी पोलीस ठाण्याच्या चकरा मारत होते. मात्र तपासाबाबत कोणतीही ठोस माहिती दिली जात नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मुलगी बेपत्ता झाल्याच्या धक्क्यातून कुटुंब सावरलेले नसतानाच पोलिसांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने कुटुंबीय मानसिक तणावाखाली होते. मुलीचे वडील तर नैराश्यामुळे आत्महत्येचा विचार करत असल्याची गंभीर बाबही समोर आली.


या प्रकरणाची माहिती मिळताच आमदार यांनी स्वतः लक्ष घालून संबंधित वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली. मुलगी बेपत्ता होऊन साडेपाच महिने होत असताना तपासात झालेल्या विलंबाबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अल्पवयीन मुलीच्या शोधासाठी सर्व यंत्रणा तातडीने कामाला लावाव्यात, स्वतंत्र तपास पथके नियुक्त करावीत आणि कुटुंबीयांना न्याय मिळवून द्यावा, अशी ठाम मागणी त्यांनी अधिकाऱ्यांकडे केली.


आमदार रोहित पवार यांनी पोलिस अधिकाऱ्यांना या प्रकरणाचा तपास युद्धपातळीवर करण्याचे आवाहन करताना, "अल्पवयीन मुलीच्या सुरक्षिततेचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. अशा प्रकरणांमध्ये विलंब होणे चिंताजनक असून संबंधित कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे," अशी भूमिका मांडल्याची माहिती मिळाली आहे.


यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत तपासात हलगर्जीपणा करणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांची चौकशी करण्याचे आश्वासन दिले. तसेच मुलीचा शोध घेण्यासाठी दोन स्वतंत्र तपास पथके स्थापन करण्यात आली असून पुढील काही दिवसांत तपासाला गती देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.


महाराष्ट्र पोलीस दलाबाबत जनतेमध्ये विश्वास असला तरी काही मोजक्या अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे सामान्य नागरिकांना न्याय मिळण्यात अडथळे निर्माण होतात. त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये जबाबदारी निश्चित करून दोषींवर कारवाई करणे गरजेचे असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.


दरम्यान, मुलीच्या सुरक्षित सुटकेसाठी आणि दोषींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी कुटुंबीयांसह सामाजिक कार्यकर्ते आणि विविध स्तरांतील नागरिकांनीही आवाज उठविला आहे. आता आमदार रोहित पवार यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घातल्याने तपासाला गती मिळेल आणि बेपत्ता मुलीचा लवकरात लवकर शोध लागेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या