फलटण | प्रतिनिधी
दि.२९/०६/२०२६
फलटण–पुसेगाव राज्य महामार्ग क्र. १४७ लगत मौजे झडकबाईचीवाडी (ता. फलटण, जि. सातारा) येथे कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करून उभारण्यात आलेला अत्याधुनिक पेट्रोल पंप व इंधन सेवा केंद्र तब्बल दोन वर्षांपासून बंद अवस्थेत असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सर्व शासकीय परवानग्या, विभागीय तपासण्या आणि अनापत्ती प्रमाणपत्रे मिळाल्यानंतरही हा प्रकल्प सुरू होऊ न शकणे ही विकास प्रक्रियेलाच लागलेली खीळ असल्याची तीव्र प्रतिक्रिया परिसरातून उमटत आहे.
सप्टेंबर २०२४ मध्ये सर्व औपचारिकता पूर्ण करून पेट्रोल पंप सुरू करण्यात आला होता. प्रत्यक्ष इंधन विक्रीलाही सुरुवात झाली; मात्र अवघ्या एका दिवसात प्रवेश व निर्गमन मार्गासमोर कुंपण उभारण्यात आल्याने पंपाची सेवा बंद पडली. त्यानंतर आजपर्यंत हा प्रकल्प नियमितपणे सुरू होऊ शकलेला नाही.
या प्रकल्पामुळे झडकबाईचीवाडी, ढवळ आणि परिसरातील हजारो नागरिक, शेतकरी, प्रवासी तसेच मालवाहतूक वाहनचालकांना जवळच्या ठिकाणी इंधन उपलब्ध होणार होते. स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी मिळणार होत्या. मात्र आज कोट्यवधींची गुंतवणूक धूळ खात पडली असून रोजगाराच्या आशाही मावळल्या आहेत.
याहून गंभीर बाब म्हणजे, प्रवेश व निर्गमन मार्गाजवळ उभारलेल्या कुंपणामुळे वाहतुकीत अडथळे निर्माण झाले असून त्या ठिकाणी अपघात झाल्याच्या घटनाही घडल्याचा दावा नागरिकांनी केला आहे. भविष्यात मोठी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोणाची, असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत.
हा प्रश्न केवळ एका उद्योगाचा किंवा एका कुटुंबाचा नसून ग्रामीण विकास, उद्योगांवरील गुंतवणूकदारांचा विश्वास, स्थानिक रोजगार आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सार्वजनिक सुरक्षिततेशी संबंधित असल्याचे मत परिसरातील नागरिक व्यक्त करत आहेत.
नागरिकांनी महसूल विभाग, पोलीस प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित सक्षम अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी पाहणी करून वस्तुस्थितीची चौकशी करावी, प्रवेशमार्गावरील अडथळा दूर करावा, अपघातांचा धोका टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात आणि हा पेट्रोल पंप त्वरित सुरू करण्यासाठी आवश्यक निर्णय घ्यावा, अशी जोरदार मागणी केली आहे.
नागरिकांचा थेट सवाल...
सर्व शासकीय मंजुरीनंतरही उद्योग बंद का?
कोट्यवधींच्या गुंतवणुकीचे संरक्षण कोण करणार?
युवकांच्या रोजगाराला जबाबदार कोण?
अपघात झाल्यास जबाबदारी कोणाची?
प्रशासन जागे होणार तरी कधी?
"उद्योग उभा राहिला... परवानग्या मिळाल्या... गुंतवणूक झाली... पण पेट्रोल पंप आजही बंद! विकासाचा मार्ग अडवणाऱ्यांवर कारवाई होणार की प्रशासन पुन्हा मौन बाळगणार?"




0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज