रामगढ / मुंबई | प्रतिनिधी
दि.२७-:महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेले हिंदू कोड बिल हे स्वतंत्र भारताच्या सामाजिक इतिहासातील अत्यंत ऐतिहासिक विधेयक असून, त्याद्वारे महिलांच्या समान न्याय, वारसाहक्क आणि स्वातंत्र्याचा भक्कम पाया रचला गेला, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले.
झारखंडमधील रामगढ येथील राधा गोविंद विद्यापीठात आयोजित "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आर्थिक आणि कामगार विषयक विचार" या विषयावरील राष्ट्रीय परिसंवादात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
यावेळी विद्यापीठाचे संस्थापक बैजनाथ शाह, अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रंगनाथ पांडे, कुलगुरू प्रा. रश्मी सिंह, महाकौशल विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. आर. सी. मिश्रा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
आठवले म्हणाले की, हिंदू कोड बिलामुळे महिलांना वारसाहक्क, संपत्तीतील समान वाटा, घटस्फोटाचा अधिकार, शिक्षण, नोकरी आणि पुरुषांच्या बरोबरीने समान हक्क प्राप्त झाले. महिलांच्या सन्मानपूर्ण आणि स्वाभिमानी जीवनासाठी आवश्यक असलेली कायदेशीर चौकट डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उभी केली.
कामगारमंत्री म्हणूनही डॉ. आंबेडकरांनी ऐतिहासिक निर्णय घेत कामाचे तास १२ वरून ८ तासांवर आणले, तसेच गर्भवती महिलांसाठी भरपगारी प्रसूती रजेची तरतूद करून कामगारांच्या हक्कांचे प्रभावी संरक्षण केले, असेही त्यांनी नमूद केले.
डॉ. आंबेडकर हे जागतिक कीर्तीचे अर्थतज्ज्ञ होते. त्यांच्या "द प्रॉब्लेम ऑफ द रुपी" या ग्रंथामुळे भारतीय आर्थिक धोरणाला नवी दिशा मिळाली. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेसाठी त्यांच्या आर्थिक विचारांचा आधार घेतला गेला. तसेच दामोदर व्हॅली प्रकल्प, धरणांद्वारे वीज निर्मिती आणि नदीजोड प्रकल्पाची संकल्पना मांडून त्यांनी देशाच्या विकासाचा दूरदृष्टीचा आराखडा तयार केला, असे आठवले यांनी सांगितले.
भारतात सामाजिक न्याय, आर्थिक विकास, कामगार कल्याण आणि महिलांच्या सक्षमीकरणाचा पाया रचणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ भारतीय संविधानाचे शिल्पकार नसून आधुनिक भारताचे दूरदर्शी राष्ट्रनिर्माते असल्याचे गौरवोद्गार रामदास आठवले यांनी यावेळी काढले.



0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज