फलटण नगरपरिषदेची धडक कारवाई; कुरेशी नगर येथील नियमबाह्य कत्तलखाना बंद करण्याचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांचे आदेश!

 

फलटण [प्रतिनिधी] दिनांक 30 जून 2026,

फलटण नगरपरिषद अंतर्गत कुरेशी नगर, मंगळवार पेठ येथील कत्तलखान्यांमध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (MPCB) नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे समोर आले आहे. या कत्तलखान्यांमध्ये सांडपाण्यावर प्रक्रिया करणारा 'इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट' (Effluent Treatment Plant - ETP) नसतानाही बेकायदेशीरपणे कत्तल सुरू असल्याच्या तक्रारीची गंभीर दखल घेत, फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी बीफ मार्केटमधील सर्व गाळेधारकांना हे कत्तलखाना तातडीने बंद करण्याचे कडक आदेश दिले आहेत. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, मंगळवार पेठ येथील रहिवासी श्री. पांडुरंग समुद्रलाल अहिवले यांनी जिल्हा सह. आयुक्त (न.प्र.शा) जिल्हाधिकारी कार्यालय सातारा यांच्याकडे या बेकायदेशीर कत्तलखान्यांविरोधात रीतसर तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाने नगरपरिषदेला तात्काळ उचित कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.


या कत्तलखान्याला पूर्वपरवानगी देताना प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (MPCB) सर्व अटी, नियम व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात कोणतीही पूर्तता न करता आणि आवश्यक यंत्रणा न उभारता हे कत्तलखाने सुरू ठेवण्यात आले होते. ही बाब 'महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५' च्या कलम २६६(२) चे थेट उल्लंघन करणारी आहे.

नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी सर्व संबंधित गाळेधारकांना बजावलेल्या अधिकृत नोटीसमध्ये स्पष्ट केले आहे की, "सुरू असलेला कत्तलखाना तात्काळ बंद करण्यात यावा. तसेच सर्व अटी व शर्तींची कायदेशीर पूर्तता केल्याशिवाय कत्तलखाना पुन्हा सुरू करू नये. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी."

नगरपरिषदेच्या या धडक आणि कडक भूमिकेमुळे फलटण शहरातील बेकायदेशीर व पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवून व्यवसाय करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, परिसरातील नागरिकांमधून या कारवाईचे स्वागत केले जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या