बारामतीच्या सर्वोपचार रुग्णालयातील प्रशासकीय अधिकाऱ्याविरोधात तक्रार; आरोग्य संचालनालयातही धाव घेणार – नवनाथ बल्लाळ



बारामती | प्रतिनिधी

दि.२९-: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, बारामती येथील प्रशासकीय अधिकाऱ्यांविरोधात गंभीर स्वरूपाची तक्रार वैद्यकीय अधिष्ठाता यांच्याकडे दाखल करण्यात आली असून, सर्व पुराव्यांसह आरोग्य संचालनालय, मुंबई येथेही तक्रार सादर करण्यात येणार असल्याची माहिती बारामती नगरपरिषदेचे स्वच्छता व आरोग्य सभापती तसेच अभ्यंगत मंडळ सदस्य नवनाथ बल्लाळ यांनी दिली.


बल्लाळ यांनी सांगितले की, रुग्णालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरती प्रक्रियेची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. भरतीमध्ये पारदर्शकता राखली जावी आणि स्थानिक युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी त्यांनी केली. तसेच सर्वसामान्य रुग्णांना दर्जेदार आणि वेळेत आरोग्य सुविधा मिळाल्या पाहिजेत, यासाठी अभ्यंगत मंडळ कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अभ्यंगत मंडळ सदस्य म्हणून दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे व निष्ठेने पार पाडणार असल्याचे सांगितले. रुग्णालयातील प्रशासन, भरती प्रक्रिया आणि नागरिकांना मिळणाऱ्या सेवांबाबत कोणतीही अनियमितता खपवून घेतली जाणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला.


यावेळी अभ्यंगत मंडळ सदस्य व नगरसेवक बिरजू मांढरे, माजी नगरसेवक समीर चव्हाण, तसेच गौरव अहिवळे, निलेश मोरे आणि संकेत शिंदे उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या