आज राजर्षी शाहू जीवन गौरव पुरस्कार दीपकभाई केदार व उत्कर्ष शिंदे यांना प्रदान होणार


अनिल वीर

कोल्हापूर,दि.२६- : मानवतावादी विचारांची जोपासना, सामाजिक परिवर्तनाची प्रेरणा आणि राजकीय तसेच सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल दिला जाणारा मानवतावादी सांस्कृतिक चळवळचा प्रतिष्ठेचा 'राजर्षी शाहू जीवन गौरव पुरस्कार २०२६' यंदा ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाई केदार आणि सुप्रसिद्ध गायक-अभिनेते उत्कर्ष शिंदे यांना जाहीर झाला आहे. या पुरस्कारांचे वितरण शुक्रवार, दि. २६ जून २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे होणार आहे.


गतवर्षी हा प्रतिष्ठेचा पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार अनिल वीर यांना प्रदान करण्यात आला होता. मानवतावादी सांस्कृतिक चळवळ आणि निर्मिती विचारमंच यांच्या संयुक्त विद्यमाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.


कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उत्तमदादा कांबळे, डॉ. कपिल राजहंस, भरत रसाळे, मदन पवार, अनिल म्हमाने, डॉ. वसंत भागवत, डॉ. शोभा चाळके, विश्वास तरटे तसेच अॅड. करुणा विमल उपस्थित राहणार आहेत.


याच दिवशी निर्मिती फिल्म क्लब व बालसाहित्य कलामंच यांच्या संयुक्त विद्यमाने सहावा नॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल आयोजित करण्यात आला असून देशभरातून निवडलेल्या २७ लघुपटांच्या निर्माते, दिग्दर्शक व कलाकारांचा सहभाग असणार आहे. बळीराजा, अनिष्ट, फड, चटका, द अनडाइंग स्पिरिट ऑफ डॉक्टर्स, निसर्ग, मायमाती, काही क्षण, वक्त, श्याम विरुद्ध श्याम, सांजवात, सजा चौरंगा, कोकणातील निसर्ग आणि शेतकरी, गजरा, आर्टिस्ट शंकर सोनावणे (डॉक्युमेंटरी), स्क्रोल, नापास, अभी ना जाओ छोड़कर, छबू, नटराजा, मधली सुट्टी, संघर्षा, फॅक्टरी, वणवा, अम्मा-द बिगीनिंग, बळीवंश आणि मित्र धन या चित्रपटांचे प्रदर्शन होणार आहे.


बालकांमधील सृजनशीलता आणि विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल आदित्य म्हमाने, प्रहर्ष मुळे, दुर्वा राजहंस, शिवाय शितोळे, अमिरत्न मिणचेकर, दीक्षा तरटे, समरजीत जितकर, भूमी पासवान, अधिराज अथने आणि स्वराली इंगळे यांना 'लोकराजा राष्ट्रीय बाल सन्मान पुरस्कार' प्रदान करण्यात येणार आहे.


तसेच डॉ. सविता व्हटकर, शंकर पुजारी, किशोर थोरात, पुरुषोत्तम पवार, डॉ. रिझवान खान, जी. एल. तिरपुडे, प्रा. सारिका उजगरे, विनायक शिंदे, प्रज्ञा काटे, अरुण भोसले, प्रा. राजेंद्र कोरे, दिनकरराव लांडगे, हर्षल सोनवणे, डॉ. झुंजार माने, सरिता सासणे, विजय नायकुडे आणि गोरखनाथ चिखलकर यांना 'राजर्षी शाहू राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार' देऊन गौरविण्यात येणार आहे.


या कार्यक्रमाचे आयोजन मुख्य निमंत्रक अंतिमा कोल्हापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहनिमंत्रक गंगाधर म्हमाने, अश्वजित तरटे, अभिजीत मासुर्लीकर, अर्हंत मिणचेकर, शिवतेज राजहंस आणि अन्वय म्हमाने यांनी केले आहे. सर्व चित्रपटप्रेमी, साहित्यिक, कलाकार आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अंतिमा कोल्हापूरकर यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या