मुंबई | प्रतिनिधी,दि.२५-:शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कथित पोलीस कोठडीतील मृत्यू प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज राज्य मानवी हक्क आयोगात सुनावणी पार पडली. या प्रकरणात न्याय मिळावा आणि कुटुंबीयांना योग्य नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आयोगासमोर करण्यात आली.
सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाकडून कोणताही प्रतिनिधी उपस्थित नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे प्रकरणाच्या गांभीर्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याची चर्चा यावेळी झाली.
या सुनावणीसाठी शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई विजयाबाई सूर्यवंशी स्वतः उपस्थित होत्या. त्यांच्या वतीने वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय महासचिव ॲड. प्रियदर्शी तेलंग यांनी प्रभावीपणे बाजू मांडत कुटुंबीयांना न्याय व आर्थिक मदत देण्याची मागणी केली.
याचिकेतील मागण्यांवर पुढील सुनावणीत निर्णय घेण्यात येईल, असे राज्य मानवी हक्क आयोगाने स्पष्ट केले असून या प्रकरणाची पुढील सुनावणी १ जुलै रोजी होणार आहे.
सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूमागील सत्य समोर यावे, दोषींवर कारवाई व्हावी आणि कुटुंबीयांना न्याय मिळावा यासाठी वंचित बहुजन आघाडी सातत्याने पाठपुरावा करत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज