सिल्वासा येथे 16 जून रोजी रिपब्लिकन पक्षाचे भव्य कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर; केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले करणार मार्गदर्शन


मुंबई, दि. ५ : – रिपब्लिकन पक्षाच्या संघटनात्मक बळकटीकरणासाठी आणि कार्यकर्त्यांमध्ये वैचारिक व नेतृत्व विकास घडवून आणण्यासाठी येत्या 16 जून 2026 रोजी सिल्वासा येथे एक दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत.


सिल्वासा येथील कुडाचा परिसरातील खडीपाडा गावामधील फोर स्टोन व्हिलेज रिसॉर्ट येथे सकाळी 11.30 वाजता या शिबिराला प्रारंभ होणार असून, मुंबई प्रदेश, ठाणे प्रदेश, पालघर जिल्हा, सिल्वासा, दिव-दमण, दादरा-नगर हवेली, वापी तसेच गुजरात आणि महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.


या प्रशिक्षण शिबिरात संघटन उभारणी, सामाजिक चळवळींची दिशा, राजकीय नेतृत्व विकास, कार्यकर्त्यांची जबाबदारी आणि पक्षविस्तार यासंदर्भात सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे. यासाठी विविध क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञ आणि अभ्यासक उपस्थित राहणार आहेत. विचारवंत व अभ्यासक Mandar Bharde तसेच सहकार क्षेत्रातील तज्ज्ञ Salim Sayyed यांच्यासह अनेक मान्यवर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.


रिपब्लिकन पक्षाच्या आगामी वाटचालीसाठी हे प्रशिक्षण शिबिर महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले आहे. संघटनात्मक मजबुती, सामाजिक न्यायाच्या विचारांचा प्रसार आणि तळागाळातील कार्यकर्त्यांचे नेतृत्व विकसित करण्याच्या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.


या शिबिरासाठी गुजरातमधील सर्व जिल्ह्यांतील कार्यकर्ते, महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी तसेच मुंबई, ठाणे, पालघर, दिव-दमण, दादरा-नगर हवेली, सिल्वासा आणि वापी परिसरातील रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.


ही माहिती पक्षाचे प्रसिद्धीप्रमुख हेमंत रणपिसे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या