प्रबुद्ध नगर ते आमराई परिसरातील गंभीर समस्या; कायमस्वरूपी उपाययोजनांसाठी मंगलदास निकाळजे यांचा एल्गार
बारामती | प्रतिनिधी
दिनांक ०९/०६/२०२६
बारामती शहरातील प्रबुद्ध नगर, दादासो नगर, वडके नगर, प्रतिभा नगर, वडार गल्ली, इंदापूर रोड आणि आमराई परिसरातील गटर व्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाला असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हजारो नागरिकांना नरकयातना सहन कराव्या लागत आहेत. वारंवार तुंबणाऱ्या गटर लाईनमुळे घाण पाणी रस्त्यांवर वाहत असून अनेक ठिकाणी नागरिकांच्या घरातही शिरत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून संतापाची लाट पसरली आहे.
या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते मंगलदास निकाळजे यांनी बारामती नगर परिषदेकडे निवेदन सादर करून तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची जोरदार मागणी केली आहे. प्रशासनाने तात्काळ जागे होऊन ठोस पावले उचलावीत, अन्यथा नागरिकांचा उद्रेक होण्याची शक्यता असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, अनेक वर्षांपूर्वी टाकण्यात आलेली गटर लाईन आता पूर्णपणे कालबाह्य झाली आहे. वाढत्या लोकसंख्येचा ताण सहन करण्याची क्षमता या व्यवस्थेत नसल्याने वारंवार गटारे तुंबत आहेत. लहान व्यासाचे पाईप, कमी क्षमतेची चेंबर्स आणि तांत्रिक त्रुटींमुळे परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. परिणामी परिसरात दुर्गंधी पसरत असून डासांचे प्रमाण वाढले आहे. डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रो यांसारख्या साथीच्या रोगांचा धोका निर्माण झाला आहे.
विशेषतः पावसाळा तोंडावर असताना ही समस्या अधिकच भयावह स्वरूप धारण करण्याची शक्यता आहे. पावसाचे पाणी आणि गटाराचे सांडपाणी एकत्र येऊन नागरिकांच्या घरात घुसत असल्याने मालमत्तेचे नुकसान होत असून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
मंगलदास निकाळजे यांनी नगर परिषद प्रशासनाने तातडीने संपूर्ण परिसराची तांत्रिक पाहणी करावी, जुनी गटर लाईन काढून मोठ्या क्षमतेची नवीन पाईपलाईन टाकावी, आधुनिक चेंबर्स उभारावीत आणि संपूर्ण गटर व्यवस्थेचे पुनर्बांधणीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी केली आहे. तसेच कायमस्वरूपी काम पूर्ण होईपर्यंत विशेष स्वच्छता पथक नेमून नियमित साफसफाई करण्यात यावी आणि पावसाळ्यात नागरिकांच्या घरात घाण पाणी शिरू नये यासाठी तातडीच्या उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी त्यांनी केली आहे.
"हा प्रश्न केवळ गटरांचा नसून हजारो नागरिकांच्या आरोग्य, सुरक्षितता आणि सन्मानाशी संबंधित आहे. प्रशासनाने तातडीने कार्यवाही करून नागरिकांना दिलासा द्यावा, अन्यथा लोकशक्तीच्या माध्यमातून तीव्र आंदोलन उभारावे लागेल," असा इशारा मंगलदास निकाळजे यांनी दिला आहे.
दरम्यान, या गंभीर समस्येकडे बारामती नगर परिषद प्रशासन नेमके कधी लक्ष देणार आणि नागरिकांना या संकटातून मुक्तता मिळणार का, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज