फलटण,दि.२२- : शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यासाठी भीम आर्मी संघटनेने पोलिस प्रशासनाला आक्रमक निवेदन दिले आहे. “गुन्हेगारांवर तात्काळ कठोर कायदे लावा, अन्यथा शहरात गुन्हेगारी आणखी वाढेल,” असा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
फलटण शहरात झपाट्याने होत असलेले शहरीकरण, वाढती लोकसंख्या आणि बेरोजगारीच्या पार्श्वभूमीवर चोरी, मारामाऱ्या, दहशत, टोळीबाजी आणि अवैध धंद्यांमध्ये वाढ होत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. शहरातील अनेक भागांमध्ये रात्रीच्या वेळी नागरिकांना असुरक्षित वाटत असून, कायद्याचा धाक कमी होत चालल्याची भावना सामान्यांमध्ये निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) तसेच एमपीडीए कायदा अंतर्गत सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना तडीपार करून शहराबाहेर हद्दपार करावे, अशीही मागणी संघटनेने केली आहे.
शहरातील कायदा व सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी मुख्य चौक, बाजारपेठ आणि संवेदनशील भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, नियमित नाकाबंदी, रात्री गस्त वाढविणे आणि कोंबिंग ऑपरेशन राबविणे अत्यंत गरजेचे असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
“फलटण शहर भीती, दहशत आणि गुन्हेगारीमुक्त झाले पाहिजे. गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा धाक निर्माण झाला पाहिजे. अन्यथा नागरिकांचा संताप वाढेल,” असा आक्रमक इशारा भीम आर्मीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.
या निवेदनावेळी अजित संभाजी मोरे, सुनील पवार, तेजस भोसले, तुषार जाधव आणि सनी पवार उपस्थित होते. आता महाराष्ट्र पोलीस प्रशासन, डीवायएसपी आणि शहर पोलिस निरीक्षक या मागणीवर काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण फलटण शहराचे लक्ष लागले आहे.

0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज