बीड,दि.२२-:वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते संदीप कोकणे, रोहित कोकणे आणि अजय बनसोडे यांच्यावर बीड जिल्ह्यातील धोंडराई येथे काही दिवसांपूर्वी जीवघेणा हल्ला झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. दोन प्रस्थापित समूहातील हस्तकांकडून हा प्राणघातक हल्ला करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला असून या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या हल्ल्यात तिन्ही कार्यकर्त्यांना गंभीर मारहाण करण्यात आली. जखमींना तातडीने उपचारासाठी बीड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेनंतर संबंधित पोलीस ठाण्याकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करण्यात आल्याचा आरोप स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केला. त्यानंतर बीड येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणात एकूण सात आरोपींचा समावेश असून त्यापैकी केवळ तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. उर्वरित चार आरोपी अद्याप फरार असल्याची माहिती समोर आली आहे. फरार आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, सुजात आंबेडकर यांनी पोलीस उपाधीक्षक कटके यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली. त्यांच्या हस्तक्षेपानंतर पोलीस प्रशासन सक्रिय झाले असून फरार आरोपींच्या शोधासाठी विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे.
पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकदीने उभी राहणार असून आवश्यक असल्यास न्यायालयीन लढाही लढला जाईल, अशी भूमिका पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केली आहे.
यावेळी सम्यकचे प्रदेश प्रवक्ते प्रशांत बोराडे, पप्पू गायकवाड, प्रमोद निकाळजे, प्रदीप शिंदे, धम्मपाल धूळधुळे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज