ग्रामस्थांचा ग्रामपंचायतीवर रोष; सोनकसवाडी ग्रामसभा कोरमाअभावी स्थगित


बारामती,दि.२२- : तालुक्यातील सोनकसवाडी ग्रामपंचायतीची आज दि. २२ मे २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेली ग्रामसभा ग्रामस्थांच्या अल्प उपस्थितीमुळे कोरम अभावी स्थगित करण्यात आली. ग्रामसभेकडे नागरिकांनी पाठ फिरवल्याचे चित्र दिसून आले असून ग्रामपंचायतीच्या कामकाजाबाबत ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी असल्याचे समोर आले आहे.


ग्रामसभे नंतर काही नागरिकांशी संवाद साधला असता, गावातील विविध विकासकामे अर्धवट अवस्थेत असल्याची तक्रार करण्यात आली. अनेक कामांकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. विशेषतः गायकवाड मळा परिसरातील पाणीपुरवठा पाईपलाईनचे काम अपूर्ण असल्याने ऐन उन्हाळ्यात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे सांगण्यात आले.


तसेच गावातील मूलभूत सुविधांबाबत प्रशासनाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. तीव्र उष्णता, अपूर्ण विकासकामे आणि विविध प्रलंबित समस्यांमुळे ग्रामस्थांनी ग्रामसभेकडे पाठ फिरवल्याचे नागरिकांनी “वंचित बहुजन यूसी”शी बोलताना सांगितले.


ग्रामस्थांच्या वाढत्या नाराजीमुळे ग्रामपंचायत प्रशासनासमोर आता विकासकामे पूर्ण करून नागरिकांचा विश्वास परत मिळवण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या