“CID कार्यालयाला टाळं ठोकू” : अजितदादांच्या मृत्यू प्रकरणावर रोहित पवार आक्रमक ४ महिने उलटूनही तपासाला गती नाही; AAIB आणि CID वर गंभीर प्रश्नचिन्ह




मुंबई / प्रतिनिधी

दि.२९/०५/२०२६

अजितदादांच्या अपघाती मृत्यू प्रकरणाचा तपास अद्यापही संथगतीने सुरू असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मृत्यूला तब्बल चार महिने उलटून गेले तरी CID कडून कोणतीही ठोस प्रगती दिसून येत नसल्याचा आरोप करत रोहित पवार यांनी थेट CID प्रशासनावर निशाणा साधला.


आज CID कार्यालयाला भेट दिल्यानंतर माध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले की, “हा केवळ अपघात होता की घातपात, याचा निष्पक्ष तपास होणं आवश्यक आहे. मात्र सध्याची परिस्थिती पाहता तपास मुद्दाम लांबवला जात आहे का? अशी शंका निर्माण होत आहे.”


यावेळी त्यांनी AAIB आणि CID या दोन्ही यंत्रणांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. “AAIB अद्याप रिपोर्ट देत नाही आणि CID अधिकारी AAIB च्या अहवालाची वाट पाहत असल्याचं सांगून स्वतःची जबाबदारी झटकत आहेत. आज आम्ही कार्यालयात गेलो असता जबाबदार अधिकारी भेटलेही नाहीत. उपस्थित अधिकाऱ्यांकडून केवळ गोलमाल आणि बेजबाबदार उत्तरं देण्यात आली,” असा आरोप त्यांनी केला.


रोहित पवार यांनी पुढे प्रशासनाला इशाराही दिला. “जर संबंधित अधिकारी कोणतंही ठोस काम करत नसतील, तर त्यांच्या कार्यालयाचा खर्च सरकारने का सहन करावा? आज आम्ही फक्त टाळं दाखवून आलो आहोत. पण पुढच्या वेळी CID कार्यालयात येऊ, तेव्हा कार्यालयाला टाळं ठोकल्याशिवाय राहणार नाही,” असा आक्रमक इशारा त्यांनी दिला.


या प्रकरणी राज्य सरकार आणि तपास यंत्रणांवर विरोधकांकडून सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात असून, आता रोहित पवार यांच्या आक्रमक भूमिकेमुळे हे प्रकरण पुन्हा चर्चेत आलं आहे. अजितदादांच्या मृत्यूमागचं खरं कारण आणि तपासातील विलंब यावरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या