सोनकसवाडी : कौशल्य विकास कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद


बारामती ,दि.२९-: तालुक्यातील सोनकसवाडी येथे ग्रामपंचायत अंतर्गत १५ व्या वित्त आयोगाच्या तरतुदीनुसार राज्य शासनाच्या कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या ३० दिवसीय मोफत शिलाई मशिन प्रशिक्षण कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.


या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये गावातील अनेक महिलांनी सक्रिय सहभाग घेत शिलाई व्यवसायाचे कौशल्य आत्मसात केले. प्रशिक्षिका राधा गायकवाड यांनी महिलांना शिलाई व्यवसायाचे सखोल मार्गदर्शन करत महिला सबलीकरणाचे महत्त्व पटवून दिले.



यावेळी प्रिती निंबाळकर यांनी मनोगत व्यक्त करताना सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक व ग्रामपंचायत सदस्यांचे आभार मानले. गावातच महिलांसाठी अशा प्रकारचे प्रशिक्षण उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.



कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी सहभागी महिलांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. उपसरपंच सौ. कल्याणी कोकरे यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.


या प्रसंगी मा. तंटामुक्ती अध्यक्ष अनिल बनकर, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष रोहन गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र कोकरे, सुनिल जेधे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. शिवानी वाघमोडे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार सौ. मीना कोकरे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या