हडपसर बनावट दारू प्रकरण : आमदार रोहित पवार यांची पिडीत कुटुंबियांना भेट; “हे मृत्यू नसून व्यवस्थेने केलेले खून”


पुणे ,दि.२९-: हडपसर परिसरात बनावट दारूमुळे मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबियांची आज आमदार Rohit Pawar यांनी भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी त्यांनी पिडीत कुटुंबीयांकडून संपूर्ण घटनेची माहिती घेत प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले.


मृत्यू झालेल्या यशवंत पवार आणि अरूण वामन दादर यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधताना आमदार रोहित पवार यांनी, “विषारी दारूमुळे मृत्यू झाला असताना संबंधित यंत्रणांनी हृदयविकाराचे खोटे कारण सांगणे अत्यंत गंभीर बाब आहे. पोलीस आणि आरोग्य विभागाने सत्य दडवण्याचा प्रयत्न केला का, याची चौकशी झाली पाहिजे,” अशी मागणी केली.


यावेळी त्यांनी स्थानिक पोलीस आणि बनावट दारू विक्रेत्यांच्या संगनमताचा आरोप करत, “आज पुण्यातील १८ कुटुंबं उद्ध्वस्त झाली आहेत. हे केवळ मृत्यू नसून व्यवस्थेच्या निष्काळजीपणातून घडलेले खून आहेत,” असा संतप्त आरोप केला.


गुन्हेगारांशी वाढते संबंध, कोयता गॅंगचा वाढता प्रभाव आणि पोलिसांच्या नावाखाली सुरू असलेल्या गैरप्रकारांमुळे पुण्याची वाटचाल गुन्हेगारी शहराकडे होत असल्याची टीकाही त्यांनी केली. “आज हडपसरमधील बनावट दारूचा अड्डा फोडला असला तरी दोषींना कठोर शिक्षा झाली नाही तर भविष्यात अशाच घटना राज्यभर घडतील,” असा इशाराही त्यांनी दिला.


तसेच मृतांच्या कुटुंबियांना तात्काळ आर्थिक मदत जाहीर करावी, संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी सरकारकडे केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या