सातारा ,दि.१९ -:सातारा जिल्हा कारागृहात नियमित अंगझडतीदरम्यान एका कैद्याकडून गांजासदृश पदार्थाच्या दोन पुड्या आढळून आल्याने कारागृह प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना दि. १७ रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा कारागृहातील सर्कल क्रमांक ३ मधील बॅरेक क्रमांक १ व ३ येथे कारागृह पोलिसांकडून नियमित तपासणी व अंगझडती सुरू होती. यावेळी न्यायालयीन कोठडीत असलेला बंदी क्रमांक ३०६ संकेत अनंत तारू याच्या अंडरविअरमध्ये लपवून ठेवलेल्या गांजासदृश पदार्थाच्या दोन लहान पुड्या आढळून आल्या.
या घटनेनंतर कारागृह प्रशासनाने तत्काळ कारवाई करत संबंधित पदार्थ जप्त केला. याप्रकरणी कारागृह कर्मचारी संदीप आनंदराव बोराटे (वय ४५, रा. जेल वसाहत, सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
फिर्यादीनुसार, बंदी संकेत अनंत तारू याच्याविरोधात गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम, १९८५ अंतर्गत कलम ८ (क) सह २७ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सातारा शहर पोलीस करत आहेत.

0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज