अनिल वीर
सातारा, दि. १८ मे २०२६
अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेने त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी दि. २० मे २०२६ रोजी औषध दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता व संयम राखावा तसेच आवश्यक औषधे आणि वैद्यकीय साहित्याचा आगाऊ साठा करून ठेवावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाने केले आहे.
अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य, सातारा येथील सहाय्यक आयुक्त रु. वि. पोंगळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बंदच्या पार्श्वभूमीवर शहर व जिल्ह्यातील बहुतांश औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता आहे. मात्र शासकीय रुग्णालये, आपत्कालीन वैद्यकीय सेवा तसेच काही निवडक औषध दुकाने सुरू राहणार आहेत. सातारा जिल्ह्यातील मेडप्लस, वेलनेस फॉरएव्हर, रुग्णालय संलग्न औषध दुकाने तसेच जेनेरिक औषध दुकाने नियमितपणे सुरू राहतील, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
प्रशासनाने सांगितले की, औषध दुकानदारांना दिलेले परवाने हे औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० अंतर्गत मंजूर करण्यात आले असून रुग्णांना वेळेवर औषधे उपलब्ध करून देणे हा त्यामागील मुख्य उद्देश आहे. त्यामुळे बंदच्या काळात औषधांचा कृत्रिम तुटवडा निर्माण होणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे.
तसेच औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा तसेच इतर लागू कायदे व आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे सांगून सर्व केमिस्ट बांधवांनी बंदमध्ये सहभागी होऊ नये, असे आवाहन सहाय्यक आयुक्त रु. वि. पोंगळे यांनी केले आहे.
आपत्कालीन संपर्क क्रमांक :
श्री. रु. वि. पोंगळे, सहाय्यक आयुक्त (औषधे), सातारा जिल्हा – ९७३००८५५८८
श्री. वि. वि. पाटील, औषध निरीक्षक, सातारा – ९१५८८२०७८५

0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज