"पहिल्या दक्षिण आशियाई सॉफ्ट हॉकी स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या कॅप्टनपदी फलटणच्या लखन नंदकुमार मोरे यांची निवड"

जयपूर/फलटण: नेपाळमधील काठमांडू येथे २० ते २२ मे २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या दक्षिण आशियाई सॉफ्ट हॉकी चॅम्पियनशिपसाठी (1st South Asian Soft Hockey Championship) भारतीय पुरुष आणि महिला संघांची घोषणा करण्यात आली आहे. या स्पर्धेत भारतीय पुरुष संघाचे कर्णधारपद फलटणचा सुपुत्र लखन मोरे याच्याकडे सोपवण्यात आले आहे. लखन मोरे याचे वडील हे ज्येष्ठ नेते श्री. शरद पवार यांचे कट्टर समर्थक आणि खंदे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. लखनच्या या सुवर्णसंधीमुळे संपूर्ण फलटण तालुक्यासह सातारा जिल्ह्यातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. दरम्यान, महिला संघाचे नेतृत्व पुद्दुचेरीची कीर्तीगा करणार आहे.

या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी जयपूर येथील द्रोणाचार्य स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये भारतीय खेळाडूंचे विशेष प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचा समारोप सोहळा सोमवारी अत्यंत उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात पार पडला. या वेळी खेळाडूंना तिरंगा ध्वज देऊन आणि त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देऊन सन्मानित करण्यात आले.


संघांची रचना खालीलप्रमाणे:

पुरुष संघ: लखन मोरे (कर्णधार - फलटण, महाराष्ट्र), मोहित मीना (उपकर्णधार). संघात अनिल पाटील, साहिल सपकाळ, साहिल रेगे, अनिश परशुरामी, ऋषिकेश सारोलकर, कृष्णा स्वामी, जुनैद खान, विजयराज जी., महेंद्रन पी. आणि जीवनंदन एम. यांचा समावेश आहे.

महिला संघ: कीर्तीगा (कर्णधार - पुद्दुचेरी), अनामिका शर्मा (उपकर्णधार). संघात अमृता गोदारा, बिंदू गोरा, उझमा खान, हिमाली सिंग, आयुषी सेंगर आणि भगवती गोदारा यांचा समावेश आहे. महिला संघाच्या प्रशिक्षक म्हणून देवांशी बघेल जबाबदारी सांभाळत


आहेत.

संघाचे प्रशिक्षक कपिल शर्मा, हर्षित यादव, मुकेश आणि अकील अहमद यांनी खेळाडूंचा उत्साह वाढवताना सांगितले की, "भारतीय संघ या वेळी दक्षिण आशियामध्ये एक नवा इतिहास रचेल."

या समारोप प्रसंगी बोलताना डॉ. आशुतोष पंत म्हणाले की, भारतामधील तरुणांमध्ये सॉफ्ट हॉकी खेळ वेगाने लोकप्रिय होत आहे. भारतीय खेळाडू आपल्या कठोर परिश्रमाने आणि समर्पणाने आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे नाव नक्कीच उज्ज्वल करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. फलटणच्या मातीने नेहमीच क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान दिले असून, लखन मोरेच्या रूपाने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय पातळीवर फलटणचा डंका वाजणार आहे. त्यांनी सर्व खेळाडूंना पूर्ण आत्मविश्वासाने आणि शिस्तीने मैदानात उतरण्याचे आवाहन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या