पुणे ,दि.२२-: देशात वाढत चाललेल्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक असंतोषामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये, विशेषतः तरुणांमध्ये प्रस्थापित व्यवस्थेविषयी तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. या परिस्थितीमुळेच आजच्या तरुणांना “कॉकरोज जनता पार्टी” सारखे नवे राजकीय पर्याय उभे करण्याची वेळ आली आहे, असे मत हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केले.
ते पुढे म्हणाले की, देशातील खदखदत्या असंतोषाला योग्य दिशा देऊन वैचारिक परिवर्तन घडवून आणण्याची ताकद आजही राष्ट्रीय काँग्रेस पक्षात आहे. त्यामुळे देशाच्या हितासाठी जनतेने पुन्हा काँग्रेसच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित विशेष सोहळ्यात ते बोलत होते. प्रियंकाजी महिला उद्योग व वसंतदादा सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात २०२६ चा स्व. राजीव गांधी कला गौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री प्रिया बेर्डे यांना प्रदान करण्यात आला.
कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी सपकाळ यांनी “उषःकाल होता होता काळरात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली” या काव्यपंक्तींचा उल्लेख केला. तसेच माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या देशाच्या जडणघडणीतील योगदानाचाही त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला.
या कार्यक्रमाला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार प्रमुख उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणात केवळ रस्ते, धरणे आणि इमारती उभारणे म्हणजे विकास नसून समाजाचा सांस्कृतिक आणि वैचारिक विकास अधिक महत्त्वाचा असल्याचे मत मांडले. राजकारणातही प्रभावी देहबोली आणि अभिनयकलेचे महत्त्व असल्याची मार्मिक टिप्पणी त्यांनी केली.
पुरस्कार स्वीकारताना प्रिया बेर्डे यांनी जुन्या संघर्षमय दिवसांच्या आठवणी सांगितल्या. आजच्या तरुण कलाकारांना त्यांनी वास्तववादी सल्ला देताना म्हटले की, मनोरंजन क्षेत्र बाहेरून आकर्षक दिसत असले तरी ते अत्यंत खडतर आहे. अपयशामुळे नैराश्य येऊ शकते, त्यामुळे प्रथम चांगला माणूस बनणे अधिक महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वसंतदादा सेवा संस्थेचे अध्यक्ष संजय बालगुडे यांनी केले. संस्था गेली ३० वर्षे कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम राबवत असल्याचे त्यांनी सांगितले. शेवटी संजीवनी बालगुडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

0 टिप्पण्या
सर्व सामान्यांचा आधार, अन्याय अत्याचाराचा कर्दन काळ वंचित बहुजन न्यूज